लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात पाहुण्या भारतीय संघाने यजमान इंग्लंड संघावर १५१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली होती. तसेच हा सामना झाल्यानंतर केएल राहुलला सामनावीर पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले होते. ज्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.
या सामन्यात केएल राहुलने पहिल्या डावात १२९ धावांची शतकी खेळी केली होती. याच खेळीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. तर अनेकांचे म्हणणे असे होते की, या सामन्यातील दोन्ही डावात मिळून ८ गडी बाद करणाऱ्या मोहम्मद सिराजला हा पुरस्कार द्यायला हवा होता. अशातच माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज सबा करीम यांनी मोहम्मद सिराज ऐवजी केएल राहुलला सामनावीर पुरस्कार देण्यामागचे कारण सांगितले आहे.
माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज सबा करीम यांनी म्हटले की, “तो (सिराज ) या पुरस्कारासाठी पात्र होता. परंतु, केएल राहुलची खेळी कौतुकास्पद होती. भारतीय संघाला कठीण परिस्थितीत फलंदाजी करायची होती. अशा परिस्थितीत केएल राहुलने रोहित शर्मासोबत मिळून भागीदारी केली होती. रोहित खेळत असताना त्याने संथ गतीने फलंदाजी केली होती. परंतु, रोहित बाद झाल्यानंतर त्याने चौफेर फटकेबाजी केली आणि भारतीय संघाला धावांचा डोंगर उभारून दिला.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “आम्ही अनेकदा चर्चा केली आहे की, भारतीय संघ जेव्हा ३५० पेक्षा अधिक धावा करेल, तेव्हा भारतीय संघाची विजय मिळवण्याची शक्यता वाढेल. यामध्ये केएल राहुलने मोलाची भूमिका बजावली होती. या खेळपट्टीवर इतर फलंदाज संघर्ष करताना दिसून येत होते. त्यावेळी केएल राहुल आणि जो रूटने शतक झळकावले. त्यामुळे माझ्या मते केएल राहुल सामनावीर पुरस्काराचा मानकरी होता.”
लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने मिळवला ऐतिहासिक विजय
भारतीय संघाने दिलेल्या २७२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलमीवीर फलंदाज लवकर माघारी परलते होते. त्यानंतर कर्णधार रूटने एकहाती झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला देखील मोठी खेळी खेळता आली नाही, तो अवघ्या ३३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर जोस बटलरने शेवटी २५ धावांची खेळी केली. परंतु त्याला देखील हा सामना वाचवता आला नाही.
अखेर भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजी समोर इंग्लिश फलंदाजांचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे १२० धावांत कोसळला. हा सामना भारतीय संघाने १५१ धावांनी आपल्या नावावर केला. याबरोबरच ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता मालिकेतील तिसरा सामना २५ ऑगस्टपासून हेडिंग्ले येथे सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई, चेन्नई पाठोपाठ सनरायझर्स हैदराबाद संघही यूएईसाठी भरारी घेण्यास सज्ज; ‘या’ दिवशी होणार रवाना
अँजेल्यू मॅथ्यूजला मिळाले नाही श्रीलंकेच्या वार्षिक करारात स्थान, निलंबित खेळाडूही यादीतून बाहेर






