भारत-पाकिस्तानचा क्रिकेट सामना म्हणजे एक पर्वणी असते. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन संघांमधील सामना नेहमीच रंगतदार होत असतो. दोन्ही देशातील चाहते हे सामने अतिशय कट्टरतेने पाहत असतात. यामुळे खेळाडूंवर देखील या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याचे दडपण असते.
मात्र जर या सामन्यात खराब कामगिरी केली, तर दोन्ही संघातील खेळाडूंना चाहत्यांच्या आणि कर्णधाराच्या रोषाचा सामना करावा लागतो. असाच काहीसा प्रकार पाकिस्तानचा माजी खेळाडू युनूस खानच्या बाबतीत घडला होता. ज्याचा खुलासा त्याने नुकताच एका मुलाखतीत केला आहे.
शून्यावर बाद झाल्याने खाल्ला होता ओरडा
साल २००० मध्ये शारजाह मध्ये भारत आणि पाकिस्तान संघात वनडे सामना खेळवला गेला होता. या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज यूनुस खान शून्यावर बाद झाला होता. भारताचा लेगस्पिनर अनिल कुंबळेने त्याला बाद केले होते. त्या सामन्यात मोईन खान पाकिस्तानचा कर्णधार होता. पाकिस्तानची फलंदाजी त्या सामन्यात चांगलीच अडखळत होती. त्यात युनूस खान शून्यावर बाद झाल्याचे पाहून कर्णधार मोईन खानच्या रागाचा पारा चढला होता.
कराचीमध्ये पत्रकारांशी बोलतांना युनूस खानने हा किस्सा उलगडला. तो म्हणाला, “मला आठवते आहे की मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात मोईन खान यांच्या कर्णधारपदाखाली केली होती. त्यांनी मला एकदा रागावले देखील होते. भारताविरुद्धच्या सामन्यात मी शून्यावर बाद झालो होतो, त्यावेळी मोईन खान नॉन-स्ट्राईकला होते. मी बाद झाल्याचे पाहून ते माझ्यावर चिडले होते. मात्र त्यांच्यामुळे मी माझ्या चुका सुधारून पुढे जाऊ शकलो. माझ्या यशस्वी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांचा मोठा वाटा आहे.”
यूनुस खानची कारकीर्द
यूनुस खान पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने ११८ कसोटी सामने खेळतांना ५२.०६ च्या लाजवाब सरासरीने १००९९ धावा काढल्या. यात ३४ शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश होता. वनडे सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने एकूण २६५ सामने खेळले. ज्यात ३१.२५ च्या सरासरीने ९६२८ धावा काढल्या. यात ७ शतके आणि ४८ अर्धशतकांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
त्या वेळी झालो होतो बेचैन, दीर्घ प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या सूर्यकुमारचा खुलासा
ही प्रसिद्ध अभिनेत्री रनमशीन विराटच्या प्रेमात झाली होती वेडी, पाहा त्यांचे व्हायरल फोटो
भारताच्या ‘या’ खेळाडूंकडे आहे चिक्कार पैसा, तरीही करतात सरकारी नोकरी; काही नावं ओळखीची