न्यूझीलंडमध्ये असा पराक्रम करणे इशांत शर्मासह केवळ या २ भारतीयांनाच जमला!

वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सध्या बासिन रिझर्व स्टेडियमवर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. आज(23 फेब्रुवारी) या सामन्यातील तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 348 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्या डावात 183 धावांची आघाडी घेतली आहे. या डावात भारताकडून वेगवान गोलंदाज इशांत शर्माने शानदार कामगिरी करताना 5 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने 22.2 षटके गोलंदाजी करताना 68 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्याची न्यूझीलंडमध्ये खेळताना एका कसोटी डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही तिसरीच वेळ होती. त्यामुळे तो न्यूझीलंडमध्ये एका कसोटी डावात 3 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा तिसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे.

याआधी असा पराक्रम केवळ झहीर खान आणि इरापल्ली प्रसन्ना या भारतीय गोलंदाजांना जमाला आहे. झहीरने 4 वेळा न्यूझीलंडमध्ये एका कसोटी डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तर प्रसन्ना यांनी 3 वेळा हा कारनामा केला आहे.

त्याचबरोबर आत्तापर्यंत न्यूझीलंडमध्ये किमान एक वेळातरी एका कसोटी डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा झहीर, प्रसन्ना आणि इशांतसह एकूण 10 भारतीय गोलंदाजांनी केला आहे. यामध्ये बिशनसिंग बेदी, भागवत चंद्रशेखर, हरभजन सिंग, मदन लाल, बापू नाडकर्णी, रवी शास्त्री आणि जवागल श्रीनाथ यांनी प्रत्येकी 1 वेळा न्यूझीलंडमध्ये एका कसोटी डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

सध्या बासिन रिझर्व स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटी सामन्यात इशांत व्यतिरिक्त आर अश्विनने 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तसेच त्यापूर्वी भारताचा पहिला डाव 165 धावांवरच संपुष्टात आला आहे.

न्यूझीलंडमध्ये सर्वाधिकवेळा एका कसोटी डावात 5+ विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज – 

4 – झहिर खान

3 – इरापल्ली प्रसन्ना

3 – इशांत शर्मा

1 – बिशनसिंग बेदी, भागवत चंद्रशेखर, हरभजन सिंग, मदन लाल, बापू नाडकर्णी, रवी शास्त्री, जवागल श्रीनाथ

You might also like