दोन वर्षांपूर्वी म्हणजेच १ ऑगस्ट २०१९ रोजी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेने आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये चूरस होती. ही चूरस शेवटपर्यंत टिकून राहिली. पण, त्यात कोविडने काहीकाळ खोडा घातला. परंतु, त्यावरही मात करत काही नियमांमध्ये बदल करत ही स्पर्धा पुढे चालू राहिली. अखेर भारत आणि न्यूझीलंड संघाने बाजी मार अंतिम सामना खेळण्याचा मान मिळवला.
या दोन वर्षांच्या कालावधीत अनेक फलंदाजांच्या बॅटमधून अविस्मरणीय खेळी निघाल्या. अनेक खेळाडूंनी खोऱ्याने धावा केल्या. या लेखातून आपण कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल जाणून घेऊ.
५. अजिंक्य रहाणे – भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेसाठी ही स्पर्धा चांगली ठरली. तो या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तर एकूण फलंदाजांच्या यादीत तो ५ व्या क्रमांकावर आहे. त्याने या स्पर्धेत १८ सामने खेळताना ३ शतकं आणि ६ अर्धशतकांसह ४२.९२ च्या सरासरीने ११५९ धावा केल्या. त्याची रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेली ११५ धावांची खेळी सर्वोत्तम ठरली.
४. बेन स्टोक्स – इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्ससाठी गेले २ वर्षे अविस्मरणीय ठरले आहेत. त्याने २०१९ चा विश्वचषक इंग्लंडला जिंकून दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेतही मोलाची कामगिरी बजावली. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इंग्लंडसाठी स्टोक्स सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरला. त्याने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीत कमालीचे योगदान दिले. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने १७ सामन्यांत ४६ च्या सरासरीने ४ शतकं आणि ६ अर्धशतकांसह १३३४ धावा या स्पर्धेत केल्या. १७६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.
३. स्टीव्ह स्मिथ – कसोटीमधील सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणती होणाऱ्या स्मिथचे सर्वाधिक धावा करणाऱ्यां ५ जणांमध्ये नाव नसते, तरच अनेकांना नवल वाटले असते. स्मिथने ऍशेसमध्ये अफलातून कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत १३ सामन्यांत ६३.८५ च्या सरासरीने १३४१ धावा केल्या. यामध्ये त्याने ४ शतकं आणि ७ अर्धशतकं केली. दरम्यान, त्याने एक द्विशतकही झळकावले. त्याने २११ धावांची खेळी मँचेस्टर येथे इंग्लंड विरुद्ध केली.
२. जो रुट – इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटने देखील या संपूर्ण स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली. विशेष म्हणजे त्याने आशिया खंडात केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने या २ वर्षांच्या कालावधीत २ द्विशतकही झळकावली. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याने २० सामने खेळताना ४७.४२ च्या सरासरीने १६६० धावा केल्या. यामध्ये त्याने एकूण ३ शतकं आणि ८ अर्धशतकं केली. त्याने २२८ धावा ही सर्वोत्तम खेळी ठरली.
१. मार्नस लॅब्यूशेन – कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या फलंदाजीने सर्वाधिक प्रभावित कोणी केले असेल तर तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्यूशेनने. ऍशेस २०१९ मध्ये स्मिथचा कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून खेळायला आलेल्या लॅब्यूशेनने नंतर मागे वळून पाहिलेच नाही. त्याने या संपूर्ण स्पर्धेत केवळ १३ सामन्यात ७२.८२ च्या सरासरीने ५ शतकांसह १६७५ धावा केल्या. यात त्याच्या ९ अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध सिडनी येथे केलेली २१५ धावांची खेळी सर्वोत्तम ठरली.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारे ६ भारतीय कर्णधार; विराटच्या नावावर आहे ‘हे’ एकमेव जेतेपद