इंदोर । जागतिक क्रिकेटमध्ये एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने काल भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या टी२० मध्ये ३५ चेंडूत शतकी खेळी केली. या खेळीत त्याने १० षटकार खेचले.
याबरोबर त्याने भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील षटकारांचा विक्रम मोडला. त्याने आता २६७ सामन्यात २५७ षटकार खेचले आहेत.
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम माजी कॅप्टन कूल एमएस धोनीच्या नावावर आहे. त्याने ४८७ सामन्यात ३३७ षटकार मारले आहेत.
या यादीत रोहितच्या पुढे दुसऱ्या स्थानावरील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने ६६४ सामन्यात २६४ षटकार मारले आहेत.
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
३३७ एमएस धोनी (सामने- ४८७)
२६४ सचिन तेंडुलकर (सामने- ६६४)
२५७ रोहित शर्मा (सामने- २६७)
२५१ युवराज सिंग (सामने- ४०२)
२४७ सौरव गांगुली (सामने- ४२४)