इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील १६व्या सामन्यात शुक्रवारी (०८ एप्रिल) गुजरात संघाने पंजाब किंग्सविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात मोलाचा वाटा उचलला तो म्हणजे गुजरातचा युवा धडाकेबाज खेळाडू शुबमन गिलने. त्याने सलामीला फलंदाजी करताना अफलातून खेळी केली आणि संघाला सलग तिसरा विजय मिळवून दिला. यादरम्यान त्याने खास कारनामा केला आहे.
पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ विकेट्स गमावत १८९ धावांचे आव्हान दिले होते. पंजाबच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिल आणि मॅथ्यू वेड सलामीला उतरले होते. वेड पावरप्लेमध्ये तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. मात्र, गिलने एका बाजूने धावफलक हलता ठेवत शेवटपर्यंत झुंज दिली. तो डावाच्या १९व्या षटकाच्या चौथ्या चेंडूपर्यंत खेळला. मात्र, पुढच्याच चेंडूवर मयंक अगरवालच्या हातून झेलबाद झाला. या सामन्यात त्याने ५९ चेंडूंचा सामना करताना ८० धावा कुटल्या. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ११ चौकार ठोकले.
5⃣0⃣ for @ShubmanGill! 👏 👏
This has been an incredible knock from the @gujarat_titans opener! 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/GJN6Rf8GKJ#TATAIPL | #PBKSvGT pic.twitter.com/ecdFI67x1M
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2022
यासह त्याने खास कामगिरी केली. तो आयपीएलमध्ये सलामीला फलंदाजी करताना पहिल्या ४० डावात सर्वाधिक वेळा सर्वोच्च धावा करणारा संयुक्तरीत्या दुसरा भारतीय खेळाडू बनला. त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली. सचिननेही १४ वेळा सलामीला फलंदाजी करताना पहिल्या ४० डावात सर्वोच्च धावा केल्या होत्या.
या यादीत अव्वल क्रमांकावर केएल राहुल आहे. त्याने तब्बल १७ वेळा ही कामगिरी केली आहे. तसेच, या यादीत चौथ्या स्थानी रॉबिन उथप्पा आहे. त्याने १३ वेळा अशी कामगिरी केली आहे.
शुबमन गिलच्या आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ६१ सामने खेळताना ५८ डावात ३३.२७च्या सरासरीने १५९७ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १२ अर्धशतके ठोकली आहेत.
आयपीएलमध्ये सलामीला फलंदाजी करताना पहिल्या ४० डावात सर्वाधिक वेळा सर्वोच्च धावा करणारे भारतीय खेळाडू
१७ वेळा- केएल राहुल
१४ वेळा- शुबमन गिल*
१४ वेळा- सचिन तेंडुलकर
१३ वेळा- रॉबिन उथप्पा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘पंत जबाबदारीने खेळला, तर या आयपीएलमध्ये अपयशी ठरेल’, भारतीय दिग्गजाचा सल्ला