---Advertisement---

शब्बास रे पठ्ठ्या! सिराजने पदार्पणाची मालिका खेळतानाच मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान

On: सोमवार, जानेवारी 18, 2021 5:17 PM
---Advertisement---

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना द गॅबा स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज चमकला आहे. त्याने या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे.

३ सामन्यातच १३ विकेट्स – 

सिराजने या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले. त्याने पहिल्याच सामन्यात सर्वांना प्रभावित करताना पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात ३ अशा मिळून एकूण ५ विकेट्स घेतल्या. तसेच त्या पुढील सामन्यात सिडनी येथे त्याने २ विकेट्स घेतल्या. तसेच सध्या सुरु असलेल्या ब्रिस्बेन कसोटीत त्याने पहिल्या डावात १ आणि दुसऱ्या डावात ५ अशा मिळून ६ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत ३ सामन्यात १३ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

त्यामुळे गेल्या ५० वर्षात ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणाच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या विदेशी गोलंदाजांमध्ये सिराजने तिसरा क्रमांक मिळवला आहे. याबरोबरच त्याने हा तिसरा क्रमांक मिळवताना इंग्लंडच्या पिटर लेवर आणि वेस्ट इंडिजच्या कर्टनी वॉल्श यांची बरोबरी केली आहे. पिटर यांनी १९७०-७१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पण करताना कसोटी मालिकेत ५ सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या होत्या. तर वॉल्श यांनीही १९८४-८५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पणच्या कसोटी मालिकेत ५ सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या होत्या.

या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचे जो पॅॅर्ट्रीज हे आहेत. त्यांनी १९६३-६४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांनी कसोटी मालिकेत ५ सामन्यांत २५ विकेट्स घेतल्या होत्या. तर त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर या यादीत इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आहे. त्याने २०१३-१४ च्या मोसमात ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी पदार्पणाची मालिका खेळताना ४ सामन्यात १५ विकेट्स घेतल्या होत्या. या विक्रमाच्या यादीतील पहिली ५ नावे लक्षात घेतली तर कळते की सिराजनी अन्य ४ जणांच्या तुलनेत सर्वात कमी सामने खेळले आहेत.

सामन्यात दोन्ही संघांचे पारडे समान – 

ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांनी पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह भारताला ३२८ धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरले. मात्र त्यांनी ११ चेंडू खेळल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबला तेव्हा भारताने १.५ षटकात बिनबान ४ धावा केल्या होत्या. आता भारताला शेवटच्या दिवशी ३२४ धावांची गरज आहे, तर ऑस्ट्रेलियाला भारताच्या सर्व १० विकेट्स घेण्याचे आव्हान आहे.

हा सामना ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील निर्णायक सामना आहे. कारण पहिल्या तीन सामन्यांनंतर दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीच्या स्थितीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

ब्रिस्बेन कसोटीतील दमदार कामगिरीनंतर सिराजची प्रतिक्रिया, ‘या’ कारणासाठी मानेल रहाणेचे आभार

ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला….

यावर्षी आशिया कप स्पर्धा भारताविनाच? ‘या’ कारणामुळे माजी विजेत्यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---