इंडियन प्रीमीयर लीगच्या चौदाव्या हंगामाचा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला २७ भावांनी पराभूत करत चेन्नईने चौथ्या वेळी आयपीएल ट्रॉफी उंचावली. या विजयासह चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आयपीएल चषक जिंकणारा सर्वात वयोवृद्ध कर्णधार ठरला.
सर्वात जास्त वयात स्पर्धा जिंकणारा कर्णधार ठरला धोनी
चेन्नईने अंतिम सामन्यात केकेआरवर मात करत चौथ्यांदा आयपीएल चषकावर आपला हक्क सांगितला. त्यांनी यापूर्वी २०१०, २०११ व २०१८ आयपीएलमध्ये विजय मिळवला होता. विशेष म्हणजे या चारही वेळी संघाचा कर्णधार एमएस धोनी हाच राहिला आहे. या विजयासह धोनीने सर्वात जास्त वय असताना आयपीएल जिंकणारा कर्णधार होण्याचा मान मिळवला.
धोनीने वयाच्या ४० व्या वर्षी ही कामगिरी केली. यापूर्वी हा विक्रम राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्न याच्या नावे होता. त्याने पहिल्या हंगामात राजस्थानचे नेतृत्व करताना ३९ व्या वर्षी ही कामगिरी पार पाडलेली. तर, दुसऱ्या हंगामात ऑस्ट्रेलियाच्याच ऍडम गिलख्रिस्टने ३७ व्या वर्षी डेक्कन चार्जर्सला विजेते बनवलेले. धोनीने वयाच्या ३८ व्या वर्षातही अशी कामगिरी केली होती.
अंतिम सामन्यात चेन्नईचे वर्चस्व
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून केकेआरने गोलंदाजीचा निर्णय घेत, सीएसकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिसचे अर्धशतक व इतर फलंदाजांच्या योगदानामुळे सीएसकेने निर्धारित २० षटकात ३ गडी गमावून १९२ धावा केल्या होत्या.
सीएसकेने दिलेल्या १९३ धावांचे आव्हान पूर्ण करण्यात केकेआर संघ अपयशी ठरला. त्यांनी निर्धारित २० षटकात ९ गडी गमावत केवळ १६५ धावा केल्या. सीएसकेसाठी शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन बळी मिळवले. तर, केकेआरसाठी व्यंकटेश अय्यर व शुबमन गिल या सलामीवीरांनी अर्धशतके साजरी केली. अशाप्रकारे त्यांना पराभव स्वीकारत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल १५ वर्षांनंतर भारत करणार पाकिस्तान दौरा? ‘या’ स्पर्धेदरम्यान दोन संघात बघायला मिळू शकतात सामने
रिचर्डसनची एक विकेट पंजाबला पडली साडेचार कोटीला; तर हर्षल सर्वात स्वस्त; जाणून घ्या सविस्तर