भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने शनिवारी (१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु असे असले तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. धोनीची कारकीर्द ही यशस्वी राहिली आहे. कर्णधार आणि एक खेळाडू म्हणून त्याने भारतीय संघासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.
धोनीच्या नेतृत्वातच भारतीय संघाने आयसीसीचा २००७ चा टी२० विश्वचषक, २०११ सालचा वनडे विश्वचषक आणि २०१३ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपली मोहोर लावली. याव्यतिरिक्त त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ आयसीसी रँकिंगमध्ये कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांक पटकाविला आहे.
२०११ सालच्या वनडे विश्वचषकातील अंतिम सामना कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकणार नाही. कारण श्रीलंकेविरुद्ध खेळताना धोनीने नुवान कुलसेकराच्या चेंडूवर षटकार ठोकत भारतीय संघाला २८ वर्षांनंतर विजेतेपद जिंकून दिला होता. एक खेळाडू म्हणून धोनीने एकूण ५३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने तब्बल १७,२६६ धावा ठोकल्या आहेत. यामध्ये १६ शतकांचा समावेश आहे.
या लेखात आपण धोनीच्या कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात खेळलेल्या शेवटच्या सामन्यातील कामगिरी नजर टाकणार आहोत.
१. शेवटचा कसोटी सामना (२६-३० डिसेंबर, २०१४)- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, धावा- ११ आणि २४*
धोनीने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण ९० सामने खेळले. त्यात त्याने ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ६ शतकेही ठोकली आहेत. कसोटीत त्याची सर्वोच्च धावसंख्या ही २२४ आहे. धोनीच्या शेवटच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर तो त्याने २६- ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.
यादरम्यान धोनीने फलंदाजी करताना पहिल्या डावात ११ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात त्याने नाबाद २४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याच्यामुळेच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना अनिर्णित करण्यात यशस्वी ठरला होता. यष्टीरक्षक म्हणून धोनीने ८ झेल आणि १ यष्टीचित केले होते.
ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात ५३० धावा केल्या होत्या. या धावांच्या आव्हानाचा सामना करताना भारतीय संघाने ४६५ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया संघाने आपला दुसरा डाव ९ बाद ३१८ धावांवर घोषित केला होता. दुसऱ्या डावात भारतीय संघाला खास कामगिरी करता आली नाही. ज्यावेळी सामना अनिर्णित झाला, त्यावेळी भारतीय संघाची धावसंख्या ही ६ बाद १७४ इतकी होती. धोनीचा कर्णधार म्हणूनही हा शेवटचा कसोटी सामना होता.
२. शेवटचा वनडे सामना (९-१० जुलै २०१९)- विरुद्ध न्यूझीलंड, मॅंचेस्टर, धावा-५०
धोनीच्या वनडे कारकिर्दीबाबत बोलायचं झालं, तर त्याने एकूण ३५० वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने ५०.५७ च्या सरासरीने आणि ८७.६५ च्या स्ट्राईक रेटने १०,७७३ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त धोनीने या धावा जमविताना आपल्या वनडे कारकिर्दीत १० शतके आणि ७३ अर्धशतके ठोकली आहेत. त्याची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या ही नाबाद १८३ आहे. यासोबतच त्याने गोलंदाजी करताना १ विकेटही आपल्या खात्यात समाविष्ट केली होती.
२०१९ च्या वनडे विश्वचषकात ९-१० जुलै रोजी खेळण्यात आलेला न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य सामना हा धोनीचा शेवटचा सामना होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २३९ धावा केल्या होत्या. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २२१ धावांवर सर्वबाद झाला. तरीही धोनीने या सामन्यात चांगली फलंदाजी करत ७२ चेंडूत ५० धावांची अर्धशतकी खेळी केली होती. या धावा करताना धोनीने १ चौकार आणि १ षटकारही ठोकला आहे. परंतु त्याला भारताला विजय मिळवून देता आले नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीची ही शेवटची खेळी होती. यादरम्यान एक योगायोग घडला होता तो असा की, धोनी आपल्या पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात धावबाद झाला होता.
३. शेवटचा टी२० सामना (२७ फेब्रुवारी २०१९)- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बेंगळुरू, धावा- ४०
भारतीय संघाला २००७ साली झालेल्या पहिल्याच टी२० विश्वचषकात विजय मिळवून देणाऱ्या धोनीने टी२० कारकिर्दीत एकूण ९८ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३७.६० च्या सरासरीने १६१७ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने २ अर्धशतकेही ठोकली आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या ही ५६ आहे.
धोनीने आपला शेवटचा टी२० सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळुरू येथे २७ फेब्रुवारीला खेळला होता. या सामन्यात धोनीने २३ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या होत्या. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९० धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ३ बाद १९४ धावा करत सामना ७ विकेट्सने आपल्या नावावर केला होता.
ट्रेंडिंग लेख-
-या ३ विदेशी खेळाडूंची उणीव जाणवणार यावर्षी आयपीएलमध्ये
-कोरोनामुळे निधन झालेल्या भारताच्या पहिल्या ‘वॉल’ बद्दल फारशा माहिती नसलेल्या १० गोष्टी
-लॉकडाऊनमध्ये ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना मिळाल्या त्यांच्या जीवनसंगिनी
महत्त्वाच्या बातम्या-
-‘धोनीने बदलला होता भारतीय क्रिकेटचा चेहरा,’ माजी पाकिस्तानी क्रिकेटरने केली धोनीची प्रशंसा
-‘ती’ गोष्ट मात्र धोनीला टी२० क्रिकेटमध्ये कधीच मिळवता आली नाही; राहील नेहमीच खंत
-‘देशाचा रत्न’ एमएस धोनीला मिळायला हवा ‘भारतरत्न’ पुरस्कार, पहा कोणी केली मागणी