भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा त्याने घेतलेल्या हटके निर्णयांसाठी ओळखला जातो. त्याने आजपर्यंत घेतलेले अनपेक्षित निर्णय बऱ्यापैकी यशस्वी ठरले आहे. असाच एक निर्णय धोनीने २०११ विश्वचषक फायनलमध्ये घेतला होता.
या विश्वचषकात युवराज तुफान फाॅर्ममध्ये होता. त्याने ८ सामन्यात ९०.५०च्या सरासरीने ३६२ धावा केल्या होत्या. असे असतानाही धोनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात युवराजआधी फलंदाजीला आला होता.
यामुळे क्रिकेटप्रेमींसह अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अखेर षटकार खेचत धोनीने हा सामना संघाला जिंकून दिला होता. सामनावीराचा पुरस्कारही त्यालाच देण्यात आला होता.
आता या निर्णयाबद्दल धोनीने मोठा खुलासा केला आहे. “मला श्रीलंकेचे जवळपास सर्वच गोलंदाज चांगले माहित होते. कारण ते चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून आयपीएलमध्ये खेळत होते. मी तेव्हा फलंदाजीला येण्याचे कारण म्हणजे मुरलीधरन गोलंदाजी करत होता. मी त्याच्याबरोबर अनेकवेळा नेटमध्ये क्रिकेट खेळलो होतो. तसेच मला आत्मविश्वास होता की त्याला सहज खेळू शकेल. याचमुळे मी तेव्हा फलंदाजीसाठी लवकर मैदानात आलो होतो.” असे धोनी यावेळी म्हणाला आहे
या मालिकेत केलेल्या अष्टपैलू कामगिरीसाठी युवराज सिंगला मालिकावीर तर अंतिम सामन्यातील कामगिरीसाठी एमएस धोनीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
अंतिम सामन्यात २ एप्रिल २०११ रोजी भारताने श्रीलंकेवर ४८.२ षटकांत ६ विकेट्सने विजय मिळवला होता. अंतिम सामन्यात भारताकडून गंभीरने ९७, विराटने ३५ तर धोनीने नाबाद ९१ धावा केल्या होत्या.