गोवा (दिनांक १३ फेब्रुवारी) – गतविजेत्या मुंबई सिटी एफसीने रविवारी इंडियन सुपर लीगमधील ( आयएसएल) सामन्यात ओदिशा एफसीवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला. सावध खेळाने सुरूवात करणाऱ्या मुंबई सिटीने हळुहळू सामन्यावरील पकड घट्ट केली आणि बाजी मारली. इगोर अॅग्युलो (४१मि.व ७० मि.) आणि बिपिन सिंग ( ४७ मि. व ७३ मि. ) या दोघांनी प्रत्येकी दोन गोल केले. ओदिशाकडून जॉनाथस क्रिस्टियनला एकमेव गोल करता आला. या विजयासह मुंबई सिटी २५ गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.
अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी गतविजेत्या मुंबई सिटी एफसीला दुसऱ्या टप्प्यात सातत्याने अपयश आलेले पाहायला मिळत आहे. सात सामन्यांनंतर अखेर त्यांनी मागील सामन्यात विजय मिळवले, परंतु त्याच जोशात मैदानावर उतरलेल्या ओदिशा एफसीने त्यांना कडवी टक्कर दिली. ३३ व्या मिनिटाला ओदिशा एफसीकडून बहारदार खेळ झाला जेरी आणि झेव्हियर हर्नांडेझ यांच्यात अप्रतिम ताळमेळ पाहायला मिळाला. जेरी गोल करणार तेच गोलरक्षक मोहम्मद नवाजने तो अडवला. ३५व्या मिनिटाला पुन्हा ओदिशा गोल करण्यानजीक पोहोचले होते. झेव्हियरने डाव्या बाजूनं सुरेख पास केला आणि जेरी गोल करण्याच्या नजिक पोहोचला होता, परंतु यावेळेस मेहताब सिंगने अगदी अखेरच्या क्षणाला एन्ट्री घेत चेंडू मैदानाबाहेर पाठवला. ओदिशाकडून होत असलेल्या आक्रमणाला मुंबईने ४१व्या मिनिटाला उत्तर दिले. ४१व्या मिनिटाला इगोरने हेडरद्वारे अप्रतिम गोल करताना मुंबईला आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या हाफमध्येही मुंबईने आक्रमक खेळ कायम राखला. ४७व्या मिनिटाला त्यांनी आघाडी डबल केली. अहमद जोशुआने बॉक्समध्ये दिलेल्या सुरेख पासवर बिपिन सिंगने गोल केला. या धक्क्यानंतर ओदिशाने सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु मुंबईचा आत्मविश्वास वाढला होता. ६२व्या मिनिटाला इगोरला गोल करण्याची संधी होती, परंतु ओदिशाच्या जेरीचा हात लागल्यामुळे तो पडला. इगोरने अम्पायरकडे फाऊलची मागणी केली, परंतु ती अमान्य करण्यात आली. ६५व्या मिनिटाला जॉनाथस क्रिस्टियन हा ओदिशाचे खाते उघडणार असे वाटत असतानाच मेहताबकडून आणखी एक सुरेख बचाव केला.
७०व्या मिनिटाला इगोरने आणखी एक गोल करताना ओदिशाचा गोलरक्षक अर्षदीप सिंग याच्यासह तीन बचावपटूंना चकवले. मुंबईने ३-० अशी आघाडी घेतली.मुंबईचे आक्रमण इथेच थांबले नाही ७३व्या मिनिटाला बिपिन सिंगने आणखी एक गोल केला. ओदिशाकडून एकमेव गोल भरपाई वेळेत जॉनाथसकडू झाला. पण, मुंबईने हा सामना ४-१ असा जिंकला.
निकाल – मुंबई सिटी एफसी ४ ( इगोर अॅग्युलो ४१मि.व ७० मि., बिपिन सिंग ४७ मि. व ७३ मि. ) विजयी विरुद्ध ओदिशा एफसी १ ( जॉनाथस क्रिस्टियन ९० मि.).