गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात बुधवारी मुंबई सिटीने साखळीतील अव्वल स्थानाच्या आशा धडाक्यात कायम राखल्या. तळातील ओदीशा एफसीचा 6-1 असा धुव्वा उडवित मुंबई सिटीने मोसमातील दणदणीत विजयाची नोंद केली. मध्य फळीतील मणीपूरच्या 25 वर्षीय बिपीन सिंगची हॅट््ट्रीक मुंबई सिटीच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली. बिपीनने या मोसमातील पहिल्यावहिल्या हॅट््ट्रीकचा मान मिळविला. आता साखळीतील अव्वल क्रमांकासाठी येत्या रविवारी मुंबई सिटी आणि सध्या आघाडीवर असलेला एटीके मोहन बागान हे दोन मातब्बर संघ आमनेसामने येतील.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सिटीने जिगरबाज खेळ केला. प्रारंभीच पेनल्टीमुळे पिछाडीवर पडूनही आणि नंतर पेनल्टी दवडूनही त्यांनी ही लढत मोठ्या फरकाने जिंकली. ओदिशाने नवव्याच मिनिटाला पेनल्टीवर खाते उघडले. आघाडी फळीतील ब्राझीलच्या 29 वर्षीय दिएगो मॉरीसिओ याने ही कामगिरी केली. त्यानंतर मुंबईने धडाका लावला. 14व्या मिनिटाला आघाडी फळीतील नायजेरीयाच्या 36 वर्षीय बार्थोलोम्यू ओगबेचे याने मुंबई सिटीला बरोबरी साधून दिली. त्यानंतर बिपीनने 38व्या मिनिटाला त्यांना आघाडी घेऊन दिली. ओगबेचेने 43व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल केला, तर मध्य फळीतील जपानच्या 23 वर्षीय सी गोडार्ड याने पुढच्याच मिनिटाला भर घातली. त्यामुळे मध्यंतरात मुंबई सिटीकडे 4-1 अशी दमदार आघाडी होती. दुसऱ्या सत्रात बिपीनने दुसऱ्याच व एकूण 47व्या मिनिटाला भर घातली. मग चार मिनिटे बाकी असताना त्याने हॅट््ट्रीकवर शिक्कामोर्तब केले.
मुंबई सिटीने 19 सामन्यांत 11वा विजय नोंदविला असून 4 बरोबरी व 4 पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 37 गुण झाले. आघाडीवरील एटीके मोहन बागानविरुद्धची पिछाडी त्यांनी तीन गुणांपर्यंत आणली. एटीकेएमबीचे 19 सामन्यांतून 40 गुण आहेत. या दोन्ही संघांचे बाद फेरीतील स्थान यापूर्वीच नक्की झाले असले तरी साखळीतील अव्वल स्थानाची चुरस कायम आहे. दोन्ही संघांचा एक सामना बाकी असून योगायोगाने तेच साखळीतील अखेरच्या लढतीत आमनेसामने येतील.
मुंबई सिटीचा गोलफरक एटीकेएमबीप्रमाणेच 15 असा झाला, पण एटीकेएमबीची कामगिरी 28-13, तर मुंबई सिटीची 33-18 अशी आहे. मुंबई सिटीचे पाच गोल जास्त आहेत. त्यामुळे रविवारी सायंकाळी 7.30 वाजता हे दोन संघ सर्वस्व पणास लावतील. ओदीशाला 19 सामन्यांत 12वा पराभव पत्करावा लागला असून एकमेव विजय व सहा बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 9 गुण व अखेरचे 11वे स्थान कायम राहिले.
मुंबई सिटीसाठी सुरुवात धक्कादायक ठरली. आठव्या मिनिटाला मुंबईचा मध्यरक्षक अहमद जाहू याने पेनल्टी क्षेत्रात मॉरीसिओला पाडले. त्यावेळी मॉरीसिओने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवून मुसंडी मारली होती. त्यामुळे रेफरी तेजस नागवेकर यांनी ओदीशाला पेनल्टी बहाल केली. त्यावर मॉरीसिओने उजवीकडे फटका मारला. मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंग याच्या हाताला लागून चेंडू नेटमध्ये गेला.
मुंबई सिटी बरोबरी साधण्यात जाहूने मग योगदान दिले. 14व्या मिनिटाला त्याने फ्री किकवर गोलक्षेत्रात अप्रतिम फटका मारला. त्यावेळी ओदीशाचा मध्यरक्षक विनीत राय व बचावपटू जेकब ट्रऍट यांच्या मधून अफलातून टायमिंग साधत धावत ओगबेचेने कौशल्य आणि चपळाई दाखविली. विनीतचा चेंडू अडविण्याचा प्रयत्न फसला आणि ओगबेचेने हेडिंगवर लक्ष्य साधले.
38व्या मिनिटाला ओगबेचेने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. त्याने उजवीकडे गोडार्डला पास दिला. गोडार्डने गोलरक्षेत्रात प्रवेश केला आणि ओगबेचेकडे चेंडू पुन्हा सोपविला. ओगबेचे याचा फटका जेकबने ब्लॉक केला. पण चेंडू बिपीनच्या दिशेने गेला. बिपीनने मग फिनिशींग केले.
43व्या मिनिटाला फ्री किकवरील कौशल्य जाहूने पुन्हा एकदा प्रदर्शित केले आमि ओगबेचेने हेडिंगची क्षमता प्रदर्शित केली. त्यामुळे मुंबई सिटीचा तिसरा गोल झाला. एक मिनिट बाकी असताना गोडार्डने उजवीकडून आगेकूच करीत लक्ष्य साधले.
दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी जेकब ट्रॅट याच्या ढिलाईमुळे ओगबेचेने चेंडूवर ताबा मिळविला. त्यानंतर त्याने मुसंडी मारली. स्वतःला संधी असूनही त्याने संघासाठी त्याग करीत बिपीनला पास दिला, कारण बिपीनला सरस संधी होती. बिपीनने मग ओदीशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याला पुन्हा निरुत्तर केले.
83व्या मिनिटाला ओदीशाचा बचावपटू कमलप्रीत सिंग याने गोलक्षेत्रात मुंबई सिटीचा बदली मध्यरक्षक विक्रमप्रताप सिंग याला पाडले. त्यामुळे मुंबई सिटीला पेनल्टी बहाल करण्यात आली. जाहूने ती घेतली, पण त्याच्या ताकदवान फटक्यात अचूकतेचा अभाव होता. त्यामुळे अर्शदीपने चेंडू हातांनी थोपवित बाहेर घालविला.
त्यानंतर दोन मिनिटांत बिपीनने हॅट््ट्रीक केली. मुंबई सिटीचा बदली मध्यरक्षक रॉलीन बोर्जेस याने नेटच्या दिशेने फटका मारला, पण चेंडू थोपविला गेला. त्याचवेळी बिपीनने रिबाऊंडवर संधी साधत फिनिशींग केले आणि हॅट््ट्रीकवर शिक्कामोर्तब केले.
संबधित बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालला हरवित नॉर्थईस्ट चौथ्या स्थानी
आयएसएल २०२०-२१: एटीके मोहन बागानने हैदराबादला रोखले
आयएसएल २०२०-२१: बेंगळुरूला हरवून गोवा तिसऱ्या स्थानी