अमिरात क्रिकेट बोर्डाने येत्या वर्षात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे फ्रँचायझी क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा केली होती. या लीगला ‘एमीरेट्स प्रीमियर लीग टी२०’ असे नाव देण्यात आले होते. तसेच या लीगमध्ये एकूण ६ संघ सहभागी होणार असल्याचेही सांगण्यात आले होते. आता याच संघांबद्दल एक महत्त्वाची माहिती पुढे येत आहे. प्रीमियर लीग टी२० मध्ये सहभागी होणाऱ्या ६ संघांमध्ये जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचेही काही संघ सामील आहेत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, आयपीएलच्या फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या एमीरेट्स प्रीमियर लीग टी२० चा भाग असणार आहेत. या दोन्ही फ्रँचायझींच्या संघमालकांनी एमीरेट्स प्रीमियर लीग टी२० मध्ये संघ विकत घेतले असल्याचे कळत आहे. त्यांच्याबरोबरच दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीसोबत भागिदारी ठेवणारे सह-संघ मालक किरण गांधी यांनीही एक संघ घेतला असल्याचे समजत आहे.
आयपीएलमधील या फ्रँचायझींव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगच्या सिडनी सिक्सर्स फ्रँचायझीही एमीरेट्स प्रीमियर लीग टी२०चा भाग असणार आहेत. तसेच मँचेस्टर यूनायटेड फुटबॉल क्लबचे मालकी हक्क असणाऱ्या ग्लॅजर फॅमिलीनेही या लीगमधील एक संघ विकत घेतला आहे. ग्लॅजर फॅमिलीने आयपीएलमधील २ नव्या संघांसाठीही बोली लावल्या होत्या.
दरम्यान युएईत होणाऱ्या एमीरेट्स प्रीमियर लीग टी२० चा थरार जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये पाहायला मिळू शकतो. या लीगची सुरुवात करण्यामागे आयपीएलचे माजी सीईओ सुंदर रमन यांचे मोठे योगदान राहिले आहे. लवकरच या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघ आणि त्यांच्या मालकी हक्कांसंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल.
बीसीसीआयचा असेल पाठिंबा
महत्त्वाचे म्हणजे, एमीरेट्स प्रीमियर लीग टी२० ला बीसीसीआयकडून भरपूर मदत मिळू शकते. कारण अमिरात क्रिकेट बोर्डाने वेळोवेळी बीसीसीआयला सहकार्य केले आहे. कोरोना काळात आयपीएलचे मागील २ हंगाम युएईमध्ये खेळवले गेले आहेत. तसेच नुकतीच संपलेली आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धाही युएईतच पार पडली आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजनावर कोरोना महामारीमुळे संकट ओढावले होते. परंतु अमिरात बोर्डाच्या सहकार्यामुळे बीसीसीआयला टी२० विश्वचषकाचे यशस्वी आयोजन करता आले.
महत्त्वाच्या बातम्या-
हॅप्पी बड्डे साक्षी! रांचीतील फार्महाऊसवर ‘असा’ साजरा झाला साक्षीचा वाढदिवस, धोनीने केले सेलिब्रेशन
फक्त एक सिक्स अन् ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या नावावर होऊ शकतो ‘हा’ मोठा विक्रम