मुंबई इंडियन्स महिला संघ महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत जबरदस्त फॉर्मममध्ये आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात एकदाही पराभवाचे तोंड पाहिले नाहीये. अशात मंगळवारी (दि. 14 मार्च) डब्ल्यूपीएल स्पर्धेतील 12वा सामना मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध गुजरात जायंट्स महिला संघात पार पडला. ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात मुंबईने गुजरातला 55 धावांनी पराभूत केले. या विजयासह मुंबई स्पर्धेतील सलग पाच सामने जिंकणारा पहिला संघ बनला. विशेष म्हणजे, मुंबईने प्ले-ऑफसाठी क्वालिफायदेखील केले आहे. या विजयात कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यासोबतच फलंदाज आणि गोलंदाजांनीही मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात गुजरात जायंट्स महिला (Gujarat Giants Women) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबई इंडियन्स महिला (Mumbai Indians Women) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 162 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात संघाला 9 विकेट्स गमावत 107 धावाच करता आल्या.
𝐅𝐈𝐕𝐄 𝐒𝐓𝐀𝐑 𝐏𝐄𝐑𝐅𝐎𝐑𝐌𝐀𝐍𝐂𝐄 ⭐⭐⭐⭐⭐#OneFamily #MumbaiIndians #AaliRe #MIvGG pic.twitter.com/V4PUv4Iz06
— Mumbai Indians (@mipaltan) March 14, 2023
गुजरातचे प्रयत्न अपयशी
यावेळी गुजरातकडून फलंदाजी करताना हरलीन देओल (Harleen Deol) हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने यावेळी 23 चेंडूत 22 धावा केल्या. यामध्ये 3 चौकारांचा समावेश होता. तिच्याव्यतिरिक्त कर्णधार स्नेह राणा (Sneh Rana) हिने 20 धावा केल्या. सुषमा वर्मा हिने 17 धावा आणि सब्भीनेनी मेघना (Sabbhineni Meghana) हिने 16 धावांचे योगदान दिले. त्यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या करता आली नाही.
यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना नॅट सायव्हर-ब्रंट (Nat Sciver-Brunt) आणि हेली मॅथ्यूज यांनी सर्वाधिक विकेट्स नावावर केल्या. ब्रंटने 4 षटके गोलंदाजी करताना 21 धावा खर्च करत 3 विकेट्स नावावर केल्या. तसेच, मॅथ्यूजने 4 षटके गोलंदाजी करताना 23 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त अमेलिया केरने 2 विकेट्स, तर इझी वोंग हिने 1 विकेट घेतली.
मुंबई इंडियन्ससाठी हरमनप्रीतची झुंज
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाकडून कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 30 चेंडूंचा सामना करताना 51 धावा चोपल्या. या धावा करताना तिने 2 षटकार आणि 7 चौकारांची बरसात केली. तिच्याव्यतिरिक्त यास्तिका भाटिया हिने 44 धावांचे योगदान दिले. तसेच, नॅट सायव्हर-ब्रंट हिने 36 धावा आणि अमेलिया केर हिने 19 धावांचे योगदान दिले. त्यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना 10 धावांचा आकडाही पार करता आला नाही.
यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना ऍशले गार्डनर हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने यावेळी 4 षटके गोलंदाजी करताना 34 धावा खर्च करत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त किम गार्थ, स्नेह राणा आणि तनुजा कंवर यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
मुंबई इंडियन्स संघ या स्पर्धेतील अजिंक्य संघ आहे. त्यांनी या स्पर्धेतील एकही सामना गमावला नाहीये. अशाप्रकारे मुंबईने पुन्हा एकदा गुणतालिकेतील अव्वल स्थान आणखी बळकट केले आहे. मुंबईचा पुढील सामना शनिवारी (दि. 18 मार्च) यूपी वॉरियर्झ संघाविरुद्ध डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (Mumbai Indians won by 55 runs against Gujarat Giants In wpl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आहा कडकच ना! WPLमधील सर्वात सुंदर महिला आहे RCBची क्रिकेटर, इंस्टाग्रामवर ‘एवढे’ लाख लोक करतात फॉलो
भरतची जागा धोक्यात! गावसकरांना वाटतंय ‘या’ खेळाडूने खेळावी WTCची फायनल; म्हणाले, ‘त्याला विसरू नका’