कोरोना संकटानंतर आता भारतात हळूहळू क्रिकेटला सुरुवात झाली आहे. नुकतीच काहीदिवसांपूर्वी सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी पार पडली, तर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेलाही या महिन्यात सुरुवात झाली आहे. याबरोबरच आता येत्या २० फेब्रुवारीपासून विजय हजारे ट्रॉफी या वनडे स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांची तयारी सुरु झाली असून मुंबई क्रिकेट असोसिएशनने बुधवारी (१० फेब्रुवारी) २२ सदस्ययी खेळाडूंचा संघही जाहीर केला आहे.
श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद –
विजय हजारे ट्रॉफीसाठी निवड झालेल्या मुंबई संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे. अय्यर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळला नव्हता. त्याआधी तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या क्रिकेट मालिकांमध्ये खेळला होता. आता त्यानंतर तो विजय हजारे ट्रॉफीमधून पुन्हा क्रिकेट मैदानात उतरताना दिसेल.
त्याच्याशिवाय पृथ्वी शॉकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. शॉ याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळला होता. मात्र, त्याला खास काही करता आले नाही. त्यामुळे त्याची इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली नव्हती. पण आता त्याला मुंबई संघाचे उपकर्णधारपद मिळाले आहे.
तसेच या संघात सुर्यकुमार यादव, यशस्वी जैयस्वाल, अखिल हेरवाडकर, आदित्य तरे, सर्फराज खान अशा खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे.
अर्जून तेंडुलकरची निवड नाही –
संभाव्य खेळाडूंच्या यादीत नाव असलेल्या अर्जून तेंडुलकरची मात्र २२ जणांच्या अंतिम संघात निवड झालेली नाही. या स्पर्धेसाठी संघनिवड होण्याआधी पार पडलेल्या सराव सामन्यात त्याला खास काही करता आले नव्हते.
रमेश पोवार प्रशिक्षकपदी –
अमित पगनिस यांनी यंदाच्या सय्यद अली मुश्ताक स्पर्धेत संघाची खराब कामगिरी असल्यामुळे मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता रमेश पोवार यांची तुर्तास विजय हजारे ट्रॉफीसाठी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
मुंबईचा एलिट डी गटात समावेश आहे. या गटाचे सामने जयपूरमध्ये खेळवण्यात येणार असून या गटात मुंबईसह दिल्ली , महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पुदुच्चेरी या संघांचा समावेश आहे.
मुंबईचा संघ –
श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ (उपकर्णधार), यशस्वी जैयस्वाल, अखिल हरवाडकर, सुर्यकुमार यादव, सर्फराज खान, चिन्मय सुतार, आदित्य तरे, हार्दिक तामोरे, शिवम दुबे, आकाश पार्कर, अतिफ अत्तरवाला, शम्स मुलानी, अर्थर्व अंकोलेकर, साईराज पाटिल, सुजीत नायक, तनुष कोतियन, प्रशांत सोलंकी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, सिद्धार्थ राऊत, मोहित अवस्थी.
महत्त्वाच्या बातम्या –
ऐश्ववर्याची मीस वर्ल्ड म्हणून निवड ते वॉर्नर-स्मिथची चोरी पकडणार अवलिया क्रिकेटर डिविलियर्स
सामना पराभूत होण्याचे मुख्य कारण कोणी क्रिकेटपटू नाही तर ‘ही’ गोष्ट, विराट आणि अश्विनचा त्रागा
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेआधी मुंबईच्या प्रशिक्षकपदी ‘या’ दिग्गजाची निवड