दक्षिण अफ्रिकेचा कसोटी संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका (NZ VS SA Test Series) यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (१७ फेब्रुवारी) क्राइस्टचर्चमध्ये सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंड संघाने खूपच अप्रतिम प्रदर्शन केले. ज्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
उभय संघातील या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री याने जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले. हेन्रीने पहिल्या दिवशी टाकलेल्या १५ षटकांमध्ये २३ धावा खर्च केल्या आणि तब्बल ७ विकेट्स घेतल्या आहेत. हेन्रीच्या गोलंदाजी प्रदर्शनाच्या जोरावर न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या ९५ धावांवर गुंडाळला. हेन्रीव्यतिरिक्त न्यूझीलंडच्या कायले जेमिसन, नील वॅग्नर आणि टिम साउदी या गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेसाठी झुबेर हमजाने सर्वाधिक २५ धावांची खेळी केली. त्याव्यतिरिक्त दक्षिण अफ्रिकेसाठी एकाही खेळाडूला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कर्णधार डीन एल्गरच्या रूपात दक्षिण अफ्रिकेला पहिला झटका मिळाला. एल्गर अवघी १ धाव करून तंबूत परतला. त्याव्यतिरिक्त कायल वॅरने आणि एडेन मार्करम यांनी अनुक्रमे १८ आणि १५ धावांची खेळी केली. हे दोघे झुबेरनंतर दक्षिण अफ्रिकेसाठी सर्वात जास्त धावा करणारे खेळाडू ठरले. संघाचे सात खेळाडू धावसंख्येत दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. अफ्रिका संघाचा पहिला डाव ४९.२ षटकांमध्ये संपला.
दक्षिण आफ्रिका संघ सर्वबाद झाल्यानंतर न्यूझीलंडला पहिल्याच दिवशी फलंदाचीसी संधी मिळाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने ३ विकेट्सच्या नुकसानावर ११६ धावा साकारल्या आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम १५ धावांवर बाद झाला. सलामीवीर वील यंगनेही अवघ्या ८ धावांवर स्वतःची विकेट गमावली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला डेवॉन कॉनवे याने ७६ चेंडूत ३६ धावा केल्या आणि डुआन ओलिव्हियरच्या चेंडूवर तो बाद झाला. न्यूझीलंसाठी सद्या हेनरी निकोल्स ३७ आणि नील वॅग्नर २ धावांसह खेळपट्टीवर खेळत आहेत. पहिल्या दिवसाच्या शेवटी दक्षिण अफ्रिका संघ २१ धावांनी पिछाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या –
श्रेयस अय्यरला वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात का मिळाली नाही जागा? रोहितकडून खुलासा
अखेर ९ वर्षांनी श्रीसंत उतरला प्रथमश्रेणी सामन्यात! पहिल्या दिवशीच केले दमदार प्रदर्शन
नवी आयसीसी क्रमवारी| विराट-बाबरसह हेजलवूडही ‘त्या’ खास यादीत सामील