भारताचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज नमन ओझाने सोमवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. जवळपास दोन दशकांच्या दीर्घ क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देत असल्याचे त्याने स्पष्ट केले.
मध्य प्रदेशच्या ३७ वर्षीय नमन ओझाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अनेक विक्रमही आहेत. रणजी करंडक स्पर्धेत यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक गडी बाद करण्याचा मन नमन ओझाचा आहे. नमन ओझाने भारताकडून २ आंतरराष्ट्रीय टी-२०, एक वनडे आणि एक कसोटी सामनाही खेळला आहे.
ओझाने सोमवारी आभासी पत्रकार परिषद घेत निवृत्तीची घोषणा केली. ही घोषणा करतना तो भावूक झाला होता. “मी आज निवृत्तीची घोषणा करत आहे. पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे. माझी कारकीर्द हा दीर्घ प्रवास होता. मला मिळालेल्या संधीसाठी मी कृतज्ञ आहे. देशाकडून आणि माझ्या राज्याच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो”, असे यावेळी ओझा म्हणाला.
ओझाने २०१० साली श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यांनतर एका आठवड्याने झिम्बावेविरुद्ध टी-२० पदार्पणही केले होते. याशिवाय ओझाने एकमेव कसोटी सामना २०१५ साली कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यांनतर त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.