भारताविरुध्च्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठीच्या संघाची घोषणा नुकतीच झाली. या संघात यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेअरिस्टोला आराम देण्यात आल्याने स्थान देण्यात आले नाही. मात्र या निर्णयावर इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसेन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मागील आठवड्यातच श्रीलंकेविरुद्ध गॉलच्या मैदानात अनुक्रमे ४७ आणि नाबाद ३५ धावांची खेळी करणाऱ्या बेअरिस्टोला संघात स्थान न देऊन इंग्लंडचे निवडकर्ते मोठी चूक करत आहेत, असे नासीर हुसेन म्हणाले. तसेच या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असेही हुसेन यांनी सुचवले आहे.
“फिरकीविरुद्ध खेळण्यास सक्षम फलंदाज”
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या वर्षातील व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन खेळाडूंना आलटून पालटून विश्रांती देण्याची रणनिती आखली आहे. त्याच रणनिती अंतर्गत बेअरिस्टोला भारत दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या संघात स्थान देण्यात आले नाही. यावर बोलताना नासीर हुसेन म्हणाले, “हा निर्णय गंभीर बाब आहे. कारण जॉनी बेअरिस्टो हा फिरकी गोलंदाजांना उत्तमपणे खेळणाऱ्या इंग्लंडच्या सर्वोत्तम तीन फलंदाजांपैकी एक आहे. इतर दोन फलंदाजांमध्ये जो रूट आणि बेन स्टोक्सचा समावेश आहे. हे दोन्ही फलंदाज चेन्नईला जात आहेत, मात्र बेअरिस्टोला मायदेशी परतण्यास सांगण्यात आले आहे.”
या निर्णयावर इंग्लंडच्या निवड समितीने पुनर्विचार करावा असे म्हणताना हुसेन म्हणाले, “मला माहिती आहे की कोरोना काळात खेळाडू सतत बायो बबलमध्ये राहून सामने खेळत आहेत. आयपीएलनंतर देखील लागोपाठ दौरे आहेत. या परिस्थितीला मी कमी लेखत नाही. या परिस्थितीत भारत दौऱ्यासाठी सर्वोत्कृष्ट संघ निवडणे निवड समितीसाठी आव्हानात्मक आहे, हे देखील मला माहित आहे. मात्र भारत दौरा किती महत्वाचा आहे, हे लक्षात घेऊन संघ निवडायला हवा होता.”
भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर ज्या पद्धतीने पराभूत केले , त्याने भारताचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असणार आहे. अशा वेळी इंग्लंडने आपला सर्वोत्तम संघ भारतासमोर उतरवायला हवा होता, असे हुसेन म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
कसोटी संघातील पुनरागमनबाबत मॅक्सवेलचे मोठे विधान, म्हणाला
लवकरच भारतात येतोय! बेन स्टोक्सने ट्विटरवर पोस्ट करत दिली माहिती, फोटो होतोय व्हायरल