नुकतेच बुधवारी (८ सप्टेंबर) भारतीय संघाने आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. यादरम्यान भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला टी२० विश्वचषकासाठी संघाचा मार्गदर्शक म्हणून निवडण्यात आल्याची देखील घोषणा केली होती. मात्र यावर आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
याबाबत बीसीसीआयच्या मुख्य परिषदेला(अधिकाऱ्यांना) टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक बनवल्यामुळे तक्रारीचे पत्र लिहिले आहे. मध्यप्रदेश क्रिकेट संघाचे माजी सदस्य संजीव गुप्ता यांनी हे तक्रार नोंदणी पत्र लिहिले आहे. गुप्ता यांच्या मते धोनीची निवड ही लोढा समितीत केलेल्या सुधारणांच्या विरोधात आहे. त्यांनी परस्पर हितसंबंधाबाबत तक्रार केली आहे.
त्यांनी बीसीसीआयच्या मुख्य परिषदेला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, “धोनीची नियुक्ती ही एका नियमाचे उल्लंघन आहे. या नियमानुसार एक व्यक्ती दोन पद धारण करू शकत नाही. धोनी सध्या आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार देखील आहे.”
गुप्ता यांनी हे पत्र बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि जय शाहसहित इतर मुख्य सदस्यांना पाठवले आहे. यामध्ये त्यांनी बीसीसीआयच्या संविधानमधील खंड ३८(४) चा हवाला दिला. ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, एक व्यक्ती दोन वेगवेगळ्या पदांवर एकाचवेळी राहू शकत नाही.
याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय सोबत बोलताना असे सांगितले. त्यामुळे बीसीसीआयच्या मुख्य परिषदेला या तक्रार नोंदणी पत्राबाबत तपासणी करण्यासाठी आपल्या कायदेशीर सल्लागारांशी बातचीत करावी लागेल. दरम्यान, धोनीने मागील वर्षी १५ ऑगस्ट २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती. धोनी सध्या केवळ आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो.
तसेच धोनीने आपल्या नेतृत्वपदात भारतीय संघाला २००७ साली टी-२० विश्वचषक स्पर्धेचे, तर २०११ साली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले होते. तसेच २०१३ साली धोनीच्या नेतृत्वपदात चॅम्पियन्स ट्रॉफीवर देखील भारतीय संघाने नाव कोरले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
–इंग्लंडने जाहीर केला टी२० विश्वचषकासाठी १५ जणांचा संघ, बेन स्टोक्सचा समावेश नाही
–टी२० विश्वचषकासाठी बांगलादेशने केली संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे सोपवले कर्णधारपद
–मोठी बातमी! टीम इंडियाचा आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह, सराव सत्र झाले रद्द