भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंड विरुद्ध भारत संघातील अखेरचा सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टर येथे खेळवला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे वृत्त गुरुवारी (९ सप्टेंबर) आले आहे.
त्यामुळे ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या अखेरच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला होणारे सराव सत्रही रद्द करण्यात आले आहे. त्याचबरोबर असेही समोर येत आहे की भारतीय संघातील सदस्यांना पुढील सूचना येईपर्यंत हॉटेल रुममध्येच थांबण्यास सांगण्यात आले आहे.
बुधवारी (८ सप्टेंबर) संध्याकाळी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीनंतर हा अहवाल आला आहे. बुधवारी सकाळी संघाने सराव केला होता.
प्रशिक्षक आहेत क्वारंटाईन
यापूर्वी चौथा कसोटी सामना सुरु असताना भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे त्यांना संघापासून वेगळे करून क्वारंटाईन करण्यात आले होते. ते अखेरच्या सामन्यासाठीही उपस्थित नसणार आहेत.
अखेरच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह
भारतीय गोटात कोरोनाची प्रकरणे आढळत असल्याने आता अखेरच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जर आणखी प्रकरणे आढळून आली तर अखेरचा सामना रद्द होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मालिकेत भारतीय संघ आघाडीवर
इंग्लंड-भारत यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिल्या ४ सामन्यांनंतर २-१ अशा फरकाने भारतीय संघ सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे अखेरचा सामना निर्णायक आहे. अखेरच्या सामन्यात भारताने विजय मिळवला किंवा सामना अनिर्णित राहिला, तर मालिकेचा निकाल भारताच्या बाजूने लागेल. तसेच मालिका पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला अखेरच्या सामन्यात विजयाचीच गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सलामीला रोहितसह विराट करणाल फलंदाजी? मुख्य निवडकर्त्यांनी दिलं उत्तर
टी२० विश्वचषकासाठी अनुभवी चहलला का मिळाले नाही टीम इंडियात स्थान, मुख्य निवडकर्त्यांनी केले स्पष्ट






