क्रिकेटमध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघाचे नाव सध्या बलाढ्य संघांमध्ये गणले जाते. पण याच न्यूझीलंड संघाच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील एक नकोसा विक्रमही आहे. ६६ वर्षांपूर्वी १९५५ ला २५ ते २८ मार्च दरम्यान ऑकलंड येथे न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना पार पडला. या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड पराभूत झाला होता. त्यामुळे त्याच्यासाठी ऑकलंडला होणारा दुसरा सामना महत्त्वाचा होता. पण याच सामन्यात त्यांनी कसोटी क्रिकेटमधील सर्वात निचांकी धावसंख्या नोंदवण्याचा नकोसा विक्रम केला.
ऑकलंडला झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड प्रथम फलंदाजीसाठी उतरले. पण सुरुवातीलाच त्यांनी गॉर्डन लेगट आणि मॅट पुरे यांच्या विकेट्स गमावल्या. पण नंतर बेर्ट सटक्लिफने केलेल्या आक्रमक ४९ धावा आणि जॉन रीडने केलेल्या ७३ धावांमुळे न्यूझीलंड ३ बाद १५४ अशा भक्कम स्थितीत होते.
परंतु, नंतर इंग्लंडकडून ब्रायन स्टॅथम आणि बॉब ऍपलयार्ड यांनी घेतलेल्या विकेट्समुळे न्यूझीलंडची स्थिती ८ बाद १९९ अशी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच न्यूझीलंड २०० धावांवर सर्वबाद झाले. या डावात स्टॅथमने ४ आणि ऍपलयार्डने ३ विकेट्स घेतल्याय
ती खेळपट्टी गोलंदाजांसाठी पोषक ठरत होती. त्यामुळे आता न्यूझीलंडला इंग्लंडचा डाव लवकर संपवण्याची संधी होती. इंग्लंडची पहिल्या डावाची सुरुवातही खराब झाली. त्यांनी टॉम ग्रेवनी आणि रेग सिम्पसन यांच्या विकेट्स लवकर गमावल्या.
पण नंतर पिटर मे आणि कॉलिन कॉऊड्री यांनी ५६ धावांची भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार लेन हटनही चांगला खेळत होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंड ४ बाद १४८ धावांवर खेळत होते.
पण तिसऱ्या दिवशी इंग्लंडची मधली फळी झटपट कोसळली. त्यामुळेे त्यांची अवस्था ७ बाद १६४ अशी झाली. पण कर्णधार हटन खेळत होता. त्याला नंतर फ्रँक टायसनची साथ मिळाली. पण हटन ५३ धावा करुन बाद झाला. मात्र टायसनने झूंज देत इंग्लंडला २४६ धावसंख्या उभारुन देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने नाबाद २७ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला ४६ धावांची आघाडी मिळाली.
न्यूझीलंच्या दुसऱ्या डावात काय झाले कोणालाही कळाले नाही. न्यूझीलंड दुपारी ३ वाजता दुसरा डाव खेळण्यासाठी आले. सुरुवातीलाच टायसनने लेगट आणि पुरेला बाद केले. दुसऱ्या बाजूने स्टॅथमने रीडला त्रिफळाचीत केले. त्यानंतर टी ब्रेक घेण्यात आला. न्यूझीलंड ३ बाद ९ धावा अशी दयनीय परिस्थितीत होता.
ब्रेकनंतर हटनने जॉनी वॉर्डलला चेंडू सोपवला. त्याने सटक्लिफला बाद केले. दुसऱ्या बाजूने हटनने ऍपलयार्डचा मारा सुरु केला. त्याने हॅरी केव्हला बाद केले. ऍपलयार्डनेच नंतर मॅकगिबनलाही बाद केले. त्याच्यापुढच्याच चेंडूवर इयान कोल्क्हूनला त्याने झेलबाद केले. त्यामुळे त्याने ४ चेंडूत ३ विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडच्या उर्वरित २ विकेट्स स्टॅथमने घेतल्या आणि न्यूझीलंडचा डाव चक्क २६ धावांवर संपुष्टात आला. आजही कसोटी क्रिकेटमध्ये ही सर्वात निचांकी धावसंख्या आहे.
#OnThisDay in 1955, England bowled out New Zealand for 26 – the lowest score in the history of Test cricket.
Do you think the record will ever be broken? pic.twitter.com/lYlF5AUHaP
— ICC (@ICC) March 28, 2019
या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी घेतली असल्याने आणि न्यूझीलंडचा दुसरा डाव २६ धावांत अटोपल्याने इंग्लंडने एक डाव २० धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात इंग्लंडकडून टायसनने २, स्टॅथमने ३, ऍपलयार्डने ४ आणि वॉर्डलने १ विकेट घेतली.
वाचा –
‘त्या’ महान अष्टपैलू क्रिकेटपटूने बरोबर ५८ वर्षापुर्वी घेतल्या होत्या ५ चेंडूत ५ विकेट्स…
भारतीय क्रिकेटचे पहिले विक्रमादित्य ‘पॉली उम्रीगर’, कर्णधारपद सोडले पण निर्णय नाही बदलला!