मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) न्यूझीलंड संघाने वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बलाढ्य इंग्लंड संघाला धूळ चारली. न्यूझीलंडने अवघ्या 1 धावेने विजय मिळवत इंग्लंडला मालिका नावावर करण्यापासून रोखले. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या विजयाचे शिल्पकार नील वॅगनर आणि केन विलियम्सन ठरले. विलियम्सनला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, न्यूझीलंडने हा सामना जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही कामगिरी करणारा न्यूझीलंड चौथाच संघ ठरला आहे.
फॉलोऑन दिल्यानंतर इंग्लंडचा पराभव
या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावत 435 धावांवर डाव घोषित केला होता. यानंतर 436 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाचा डाव अवघ्या 209 धावांवर संपुष्टात आला होता. अशाप्रकारे इंग्लंडकडे 226 धावांची आघाडी होती. त्यामुळे त्यांनी न्यूझीलंडला फॉलोऑन (Follow on) दिला. यावेळी न्यूझीलंडने दुसऱ्या डावात दम दाखवून दिला. त्यांनी यावेळी सर्व विकेट्स गमावत 483 धावांचा डोंगर उभा केला. यानंतर इंग्लंडला विजयासाठी 257 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान पार करताना इंग्लंड संघ विजयाच्या जवळ गेला, पण न्यूझीलंडने विजय हिसकावून घेतला. इंग्लंडला यावेळी 256 धावाच करता आल्या, त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना 1 धावेने खिशात घातला. विजय मिळवताच न्यूझीलंडच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
फॉलोऑननंतर विजय मिळवणारा चौथाच संघ
न्यूझीलंड हा फॉलोऑननंतर विजय मिळवणारा चौथाच संघ बनला. यापूर्वी इंग्लंडने दोन वेळा, तर भारताने एक वेळा अशी कामिगिरी केली होती. डिसेंबर, 1894 साली सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळताना इंग्लंडने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध फॉलोऑननंतर 10 धावांनी विजय मिळवण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर याच दोन संघांमध्ये लीड्स येथे जुलै 1981मध्ये एका कसोटी सामन्याचा निकाल इंग्लंडच्याच बाजूने लागला होता. ऑस्ट्रेलियाकडून फॉलोऑन मिळाल्यानंतर इंग्लंडने झुंजार खेळी करत 18 धावांनी विजय मिळवला होता.
https://twitter.com/cricketcomau/status/1630417029382676482
त्यानंतर मार्च, 2001मध्ये कोलकाता येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. यातील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने फॉलोऑन घेत 657 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाचा डाव 212 धावांवर संपुष्टात आला होता. अशाप्रकारे भारताने हा सामना 171 धावांनी खिशात घातला होता. यानंतर आता न्यूझीलंडही फॉलोऑननंतर विजय मिळवणारा चौथा संघ बनला आहे. (new zealand is the fourth team to Winning a Test after following on)
फॉलोऑननंतर कसोटी सामने जिंकणारे संघ
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, 1894
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लीड्स, 1981
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिआ, कोलकाता, 2001
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, वेलिंग्टन, 2023*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईतील सामन्यादरम्यानची घटना! फलंदाजाच्या शॉटमुळे मैदानावरच कोसळले बीसीसीआयचे पंच, व्हिडिओ व्हायरल
ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या यशाचे गमक आहे ‘सपोर्ट स्टाफ’! स्वतः खेळाडूंनी केला ‘तो’ खुलासा






