---Advertisement---

त्या दोन खेळाडूंनी मैदानावर केले असे काही की सगळं जग झालं भावुक

On: गुरूवार, जानेवारी 30, 2020 12:13 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेत सध्या 19 वर्षांखालील विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकात काल(29 जानेवारी) 19 वर्षांखालील न्यूझीलंड विरुद्ध 19 वर्षांखालील वेस्ट इंडिज संघात उपांत्यपूर्व फेरीचा सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 2 विकेट्सने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

न्यूझीलंड संघाच्या या विजयाबरोबरच त्यांचा कर्णधार जेसी ताशकोफ आणि जॉय फील्ड या खेळाडूंनी या सामन्यादरम्यान दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

झाले असे की प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजचा फलंदाज किर्क मॅकेन्झीला 43 व्या षटकाच्या अखेरीस उजव्या पायाला क्रॅम्प आला. त्यामुळे त्याला वेदना होत होत्या. तसेच या वेदनांमुळे त्याला 99 धावांवर असताना रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले.

पण वेस्ट इंडिजची 9 वी विकेट गेल्यानंतर मॅकेन्झी पुन्हा मैदानावर आला. परंतू त्याला वेदना होत असल्याने पाय हलवता येत नव्हता. तो मैदानावर पुन्हा आल्यानंतर पहिलाच चेंडू खेळताना क्रिस्तिन क्लार्कच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे वेस्ट इंडिजचा डाव 238 धावांवर संपुष्टात आला.

पण बाद झाल्यानंतर पुन्हा मैदानातून बाहेर जाताना मॅकेन्झीने केलेल्या 99 धावांच्या खेळीचे न्यूझीलंडचे खेळाडू कौतुक करत होते. मात्र याचदरम्यान मॅकेन्झी चालताना संघर्ष करत असल्याचे पाहून न्यूझीलंडचा कर्णधार ताशकोफ आणि फील्ड हे युवा क्रिकेटपटू पुढे आले. त्यांनी दुखापतग्रस्त मॅकेन्झीला उचलून घेतले आणि मैदानाबाहेर नेले. त्यांच्या या खिलाडूवृत्तीचे सर्वांनी कौतुक केले आहे.

https://twitter.com/cricketworldcup/status/1222568945204498433

ताशकोफ आणि फिल्ड दोघांनी या सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना चमकदार कामगिरीही केली. गोलंदाजी करताना या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर न्यूझीलंड संघाकडून क्लार्कने 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजी करतानाही क्लार्क आणि फिल्डने 9 व्या विकेटसाठी नाबाद 86 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.  क्लार्कने नाबाद 46 तर फिल्डने नाबाद 38 धावा केल्या. मात्र कर्णधार ताशकोफला फलंदाजी करताना केवळ 6 धावाच करता आल्या. 

https://twitter.com/Maha_Sports/status/1222528457910800384

https://twitter.com/Maha_Sports/status/1222526035209728000

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---