विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय कसोटी संघाने गेल्या काही वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बलाढ्य संघ का म्हटले जाते? हे ते नेहमीच मैदानात दाखवून देत असतात. सलग पाचव्या वर्षी भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी संघाच्या यादीत प्रथमस्थानी विराजमान आहे. परंतु भारतीय संघाचे प्रथम स्थान आता न्यूझीलंड संघामुळे धोक्यात येऊ शकते.
येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला आयसीसीच्या कसोटी संघाच्या यादीत पहिले स्थान गाठण्याची संधी असणार आहे. येत्या २ जूनपासून न्यूझीलंड संघ इंग्लंड संघाविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघाने इंग्लंड संघाला २-० ने धूळ चारली तर न्यूझीलंड संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान होऊ शकतो.
असे झाले तर बदलू शकते समीकरण
न्यूझीलंड संघाने २ जूनपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला तर न्यूझीलंड संघ पहिल्या स्थानी विराजमान होईल. तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी घसरेल. त्यानंतर दुसऱ्या सामन्याच्या निकालावर भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. जर दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाने पुनरागमन करत न्यूझीलंड संघाला पराभूत केले तर भारतीय संघ पुन्हा पहिल्या स्थानी ताबा मिळवेल. सध्या न्यूझीलंड संघ कसोटी क्रमवारीत दुसऱ्या तर इंग्लंड संघ तिसऱ्या स्थानावर आहे.
साउथॅम्प्टनमध्ये रंगणार विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना
न्यूझीलंड संघाने इंग्लंड संघावर २-० ने विजय मिळवला तर भारतीय संघाला प्रथम स्थान मिळवण्यासाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवावा लागेल. भारतीय संघ १२१ पॉइंट्ससह कसोटी क्रमवारीत पहिल्यास्थानी आहे. तर १२० पॉइंट्ससह न्यूझीलंड संघ दुसऱ्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
फक्त कोहली-आझम असे फलंदाज आहेत, ज्यांची फलंदाजी शैली सर्वजण फॉलो करतात; ‘आशियाई ब्रॅडमन’चे बोल
भारताच्या श्रीलंका दौऱ्याचा वाढणार रोमांच, ३ नव्हे ‘इतक्या’ सामन्यांची होणार टी२० मालिका!
भारतीय महिला क्रिकेटरसोबत झाला होता वाद, आता त्याच संघाचे बनलेत ‘महागुरु’; जाणून घ्या त्यांच्याविषयी