न्यूझीलंड संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्स हा आज(१३ जून) आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. ख्रिस केर्न्सचा जन्म १९७० मध्ये न्यूझीलंडच्या पिक्टनमध्ये झाला होता. त्याने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. ख्रिस केर्न्स हा त्या निवडक खेळाडूंपैकी एक आहे, जे संधी मिळताच फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये दोन्ही क्षेत्रात संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतात.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २००० साली झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ख्रिस केर्न्सने भारतीय संघाला अडचणीत टाकले होते. परंतु त्यानंतर त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते. त्याची परिस्थिती आता हलाखीची झाली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध केले होते पदार्पण
ख्रिस केर्न्स याने १९८९ मध्ये, जॉन राईटच्या नेतृत्वाखाली खेळताना,आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्या कसोटी सामन्यात तो आपली छाप सोडण्यास अपयशी ठरला होता. परंतु त्याने आपल्या गतीने विरोधी संघातील फलंदाजांना अक्षरशः घाबरवून सोडले होते.
त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने न्यूझीलंड संघासाठी ६२ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३३२० धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने २१८ गडी देखील बाद केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १३ वेळेस ५ गडी बाद केल्याचा पराक्रम केला आहे. तसेच २१८ वनडे सामन्यात त्याने ४९५० धावा करत २०१ गडी बाद केले आहेत. वनडे मध्ये त्याने ९ शतक आणि ४८ अर्धशतक केले आहेत.
भारतीय संघाकडून खेचून घेतली होती आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी
ख्रिस केर्न्सने, २००० मध्ये भारतीय संघाविरुद्ध झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात सौरव गांगुलीने ११७ धावांची खेळी केली होती तर, सचिन तेंडुलकरने ६९ धावांचे योगदान दिले होते. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना २६४ धावा केल्या होत्या. तर ख्रिस केर्न्सने गोलंदाजी करताना, १० षटकात अवघ्या ४० धावा खर्च केल्या होत्या. पण यामध्ये त्याला एकही गडी बाद करण्यात यश आले नव्हते.
या २६५ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाला साजेशी सुरुवात करण्यास अपयश आले होते. व्यंकटेश प्रसाद यांनी दुसऱ्याच षटकात क्रेग स्पेयरमेन याला माघारी धाडले होते. न्यूझीलंड संघाचे १०९ धावांवर ४ गडी बाद झाले होते. सर्वांना वाटू लागले होते की, भारतीय संघ या सामन्यात एकहाती विजय मिळवणार, परंतु ख्रिस केर्न्सने अवघ्या ११३ चेंडूत १०२ धावांची खेळी करत न्यूझीलंड संघाला विजय मिळवून दिला होता.
क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर, ख्रिस केर्न्सने २०१० मध्ये दुबईत डायमंडचा बिजनेस केला होता. परंतु २०१३ मध्ये त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. ज्यामुळे त्याची संपूर्ण संपत्ती जप्त केली गेली होती. ख्रिस केर्न्सला आता कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्याने पोट भरण्यासाठी, ऑकलंडमध्ये बस धुण्यापासून ते ट्रक चालवण्याचे देखील काम केले. तसेच त्याला बारमध्ये देखील काम करावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या –
हर्षेल गिब्सने सोडलेल्या ‘त्या’ ऐतिहासिक झेलाला झाली २२ वर्ष, पाहा व्हिडिओ
“लोक मला मिस्ट्री स्पिनर म्हणत असले तरी मी लेग स्पिनर”, भारतीय फिरकीपटूचे वक्तव्य
उलाढाल कोट्यावधींची! सेवा निवृत्तीनंतरही कॅप्टनकूल धोनी करतो ‘विक्रमतोड’ कमाई, पाहा कसं ते