भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात सलामीवीर मयंक अगरवालच्या दीडशतकाच्या जोरावर ३२५ धावा उभारल्या. न्यूझीलंडच्या एजाज पटेलने भारताचे सर्व गडी बाद करत एक नवा इतिहास रचला. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या ६२ धावांमध्ये गुंडाळत मोठी आघाडी घेतली. याचबरोबर न्यूझीलंड संघाच्या या निच्चांकी धावसंख्येनंतर त्यांच्या नावावर अनेक नकोसे विक्रम नोंदवले गेले.
भारतीय गोलंदाजांची भेदक गोलंदाजी
भारतीय संघाने पहिल्या डावात ३२५ धावा केल्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज मैदानात उतरले. मात्र, या सामन्यातून संघात पुनरागमन करणाऱ्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एका पाठोपाठ तीन धक्के देत न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १७ अशी केली. त्यानंतर रविचंद्र अश्विन, जयंती यादव व अक्षर पटेल या फिरकी तिकडीने अनुक्रमे चार, एक व दोन बळी मिळवत न्यूझीलंडचा डाव २८.१ षटकात ६२ धावांवर गुंडाळला.
न्यूझीलंडच्या नावे अनेक नकोसे विक्रम
न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक फलंदाजीचे प्रदर्शन करताना लागोपाठ बळी गमावले. त्यांचा संपूर्ण संघ ६२ धावांवर सर्वबाद झाल्यामुळे न्यूझीलंड भारताविरुद्ध भारतात सर्वात कमी धावसंख्येवर सर्वबाद होणार संघ ठरला. यापूर्वी, वेस्ट इंडिज संघ १९८७ मध्ये दिल्ली कसोटीत ७५ धावांवर सर्वबाद झाला होता. त्याचबरोबर ही भारताविरुद्धची सर्वांत निच्चांकी धावसंख्यादेखील आहे.
याचबरोबर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यातील देखील सर्वात कमी धावसंख्या ठरली. २००२ हॅमिल्टन कसोटीत यजमान न्यूझीलंड संघ ९४ धावांवर बाद झालेला. तसेच, वानखेडे स्टेडियमवरीलदेखील ही सर्वात कमी धावसंख्या ठरली. वानखेडे स्टेडियमवरील सर्वात कमी धावसंख्येचा नकोसा विक्रम भारतीय संघाच्या नावावर होता. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००४ सालच्या कसोटीत ९४ भावांवर सर्वबाद झालेला.
महत्त्वाच्या बातम्या-
साहाची विकेट एजाजसाठी भलतीच खास; १० बळी घेतल्यावरच नव्हे, तर ५ बळी घेताच पठ्ठ्याने केलाय भीमपराक्रम
२१ व्या शतकातील पहिला ‘परफेक्ट टेन’ घेणारा देबाशिष मोहंती विस्मृतीत गेलाय