विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळाडूंना दुखापतीपासून दूर ठेवण्याचे आव्हान सर्व संघापूढे आहे. पण असे असतानाच दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्रस्त आहे. रविवारी बांगलादेश विरुद्ध पार पडलेल्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी दुखापतग्रस्त झाला आहे.
त्यामुळे आधीच अन्य खेळाडूही दुखापतग्रस्त असल्याने दक्षिण आफ्रिकेसमोरील समस्या वाढल्या आहेत. त्यात त्यांना बांगलादेश विरुद्ध 21 धावांनी पराभवही स्विकारावा लागला आहे.
रविवारी बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका प्रथम गोलंदाजी करत असताना एन्गिडी केवळ 4 षटके गोलंदाजी केल्यानंतर हँमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. त्यावेळी सामन्यात केवळ 7 षटकांचा खेळ झाला होता.
तसेच नंतर स्पष्ट करण्यात आले की तो या उर्वरित सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सामन्याच्या सुरुवातीलाच हा धक्का बसला होता. 23 वर्षीय एन्गिडीने बांगलादेश विरुद्ध 4 षटके गोलंदाजी करताना 34 धावा दिल्या होत्या.

त्याच्या या दुखापतीबद्दल सांगताना दक्षिण आफ्रिकेचे व्यवस्थापक डॉ. मोहम्मद मुसाजींनी सांगितले की या दुखापतीमुळे त्याला 5 जूनला भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यालाही मुकावे लागणार आहे.
डॉ. मोहम्मद मुसाजी म्हणाले, ‘त्याची(एन्गिडीची) तपासणी करण्यात आली आणि वैद्यकीयदृष्ट्या आम्हाला वाटले की त्याला डाव्या हँमस्ट्रिंगचा त्रास झाला आहे. आम्ही निर्णय घेतला की या उर्वरीत सामन्यात(बांगलादेशविरुद्ध) त्याला मैदानावर पाठवायचे नाही.’
‘त्यामुळे सध्या कदाचित त्याला आठवडाभर किंवा 10 दिवसांसाठी बाहेर बसावे लागणार आहे. पण आम्ही उद्या त्याचे स्कॅन करणार आहोत. त्याला वेस्ट इंडिजच्या सामन्याआधी फिट करण्याची आमची योजना आहे.’
दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजविरुद्ध 10 जूनला सामना होणार आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिका बुधवारी(5 जून) भारताविरुद्ध सामना खेळणार आहे. भारताविरुद्धच्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि अनुभवी फलंदाज हाशिम अमला संघात पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे.
स्टेन आयपीएलदरम्यान झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे या विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेच्या आत्तापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात खेळलेला नाही. तसेच अमलाला इंग्लंड विरुद्ध 2019 विश्वचषकातील पहिलाच सामना खेळताना डोक्याला चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. त्यामुळे तो बांगलादेश विरुद्ध खेळला नव्हता.
दक्षिण आफ्रिकेला 2019 विश्वचषकात त्यांच्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–वाढदिवस विशेष: सुलतान ऑफ स्विंग – वसीम अक्रम
–विश्वचषक २०१९: भारत, पाकिस्तानलाही जे जमले नाही ते बांगलादेशने करुन दाखवले
–दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामनावीर ठरलेल्या शाकिब अल हसनने केला खास विश्वविक्रम




