गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमातील अपयशी मालिका बेंगळुरू एफसीने अखेर मंगळवारी खंडित केली. मुंबईकर राहुल भेकेच्या गोलमुळे माजी विजेत्या बेंगळुरूने नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधत चाहत्यांना दिलासा दिला.
वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. नॉर्थईस्ट युनायटेडचे खाते 27 व्या मिनिटाला आघाडी फळीतील पोर्तुगालचा 28 वर्षीय खेळाडू लुईस मॅचादो याने उघडले. नॉर्थईस्ट युनायटेडने मध्यंतरास ही आघाडी राखली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात 49व्या मिनिटाला बेंगळुरूला बचाव फळीतील भारताचा 30 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडू राहुल भेके याने बरोबरी साधून दिली.
बेंगळुरूने 11 साामन्यांत चौथी बरोबरी साधली असून तीन विजय व चार पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 13 गुण झाले. त्यांचे सहावे स्थान कायम राहिले, पण पाचव्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीला त्यांनी गुणांवर गाठले. जमशेदपूरचा गोलफरक शून्य (12-12) आहे, तर बेंगळुरूचा उणे 1 (13-14) असा आहे.
पहिले सहा सामने अपराजित राहिलेल्या बेंगळुरुची नंतर अनपेक्षित घसरण झाली. त्यांना सलग चार पराभव पत्करावे लागले. त्यामुळे स्पेनचे कार्लेस कुआद्रात यांच्याबरोबरील करार एकमेकांच्या सहमतीने संपविण्यात आला. आता नौशाद मुसा यांच्याकडे हंगामी प्रशिक्षकपद आहे. त्यांच्या पहिल्या सामन्यात बेंगळुरूला एससी ईस्ट बंगालविरुद्ध पराभूत व्हावे लागले. त्या पार्श्वभूमीवर ही बरोबरी महत्त्वाची ठरली.
नॉर्थईस्टला 11 सामन्यांत सहावी बरोबरी पत्करावी लागली असून दोन विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 11 गुण झाले. त्यांचे आठवे स्थान कायम राहिले.
मुंबई सिटी एफसी 10 सामन्यांतून आठ विजयांसह 25 गुण मिळवून आघाडीवर आहे. एटीके मोहन बागान दुसऱ्या क्रमांकावर असून 10 सामन्यांत सहा विजयांसह त्यांचे 20 गुण आहेत.
हैदराबाद एफसी व एफसी गोवा यांचे प्रत्येकी 15 गुण आहेत. दोन्ही संघांचा गोलफरक 2 असा समान आहे. यात गोव्यापेक्षा दोन गोल जास्त केले असल्याने (15-13) हैदराबादचा तिसरा क्रमांक आहे.
खाते उघडण्याची शर्यत नॉर्थईस्ट युनायटेडने जिंकली. मध्य फळीतील फेडेरिको गॅलेगो याने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला आणि नेटच्या दिशेने घोडदौड सुरु केली. बॉक्सच्या बाहेरून त्याने फटका मारला, तो पूर्णपणे चुकला. पण त्याच्या तसेच संघाच्या सुदैवाने डावीकडील मॅचादोसाठी संधी निर्माण झाली. मॅचादोन सहा यार्ड अंतरावरून डाव्या पायाने फटका मारत बेंगळुरुचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याला चकवून शानदार फिनिशींग केले.
दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी बेंगळुरूने बरोबरी साधली. मध्य फळीतील डिमास डेल्गाडो याने घेतलेल्या फ्री किकवर भेकेने डाव्या पायाने नेटच्या उजव्या कोपऱ्यात चेंडू मारताना नॉर्थईस्ट युनायटेडचा गोलरक्षक गुरमीत याला चकविले. गुरमीतला झेप टाकूनही चेंडू अडविता आला नाही.