---Advertisement---

आयएसएल २०२०-२१ : ओदीशाला हरवून नॉर्थईस्ट तिसऱ्या स्थानी

On: रविवार, फेब्रुवारी 14, 2021 10:14 PM
---Advertisement---

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात बाद फेरी गाठण्याची संधी नॉर्थईस्ट युनायटेडने रविवारी भक्कम केली. तळातील ओदीशा एफसीवर 3-1 असा अप्रतिम विजय मिळवित नॉर्थईस्ट युनायटेडने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. सामन्यातील चारही गोल पहिल्या सत्रात झाले.

वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. नॉर्थईस्टने अर्ध्या तासाच्या आत तीन गोल केले. नवव्या मिनिटाला आघाडी फळीतील पोर्तुगालच्या 28 वर्षीय लुईस मॅचादो याने खाते उघडले. दहा मिनिटांनी आघाडी फळीतील जमैकाच्या 30 वर्षीय देशोर्न ब्राऊन याने संघाचा दुसरा गोल केला. त्यानंतर 24व्या मिनिटाला मॅचादोने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल केला. ओदीशाचे खाते मध्य फळीतील ऑस्ट्रेलियाच्या 29 वर्षीय ब्रॅडेन इनमन याने पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत उघडले.

नॉर्थईस्ट युनायटेडने 17 सामन्यांत सहावा विजय मिळविला असून आठ बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 26 गुण झाले. त्यांनी एफसी गोवा आणि हैदराबाद एफसी या दोन संघांना मागे टाकून तिसरे स्थान गाठले. गोवा आणि हैदराबादची 17 सामन्यांतून 24 गुण अशी समान कामगिरी आहे. यात गोवा सरस गोलफरकामुले तिसरा, तर हैदराबाद पाचवा आहे. नॉर्थईस्ट युनायटेडने नजिकच्या या दोन प्रतिस्पर्ध्यांवर दोन गुणांची आघाडी घेऊन बाद फेरीच्या आशा भक्कम केल्या.

बाद फेरीतील तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी जोरदार चुरस सुरु आहे. यात नॉर्थईस्ट युनायटेडने निर्णायक विजयाचे तीन गुण गमावले आणि तीन गोलांसह गोलफरकही सुधारला.

अखेरच्या 11व्या क्रमांकावर असलेल्या ओदीशाला 17 सामन्यांत दहावा पराभव पत्करावा लागला. एक विजय व सहा बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे नऊ गुण कायम राहिले.

नॉर्थईस्टने खाते उघडण्याची शर्यत नवव्याच मिनिटाला जिंकली. आघाडी फळीतील सुहैर वडाक्केपीडीका याने उजवीकडून ही चाल रचली. त्याने डावीकडील बचावपटू आशुतोष मेहता याला पास दिला. मेहताच्या अचूक पासवर मॅचादोने फिनिशींग केले. ओदीशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याला झेप टाकूनही चेंडू अडविता आला नाही.

दहा मिनिटांनी ब्राऊनने भर घातली. मध्यरक्षक फेडेरीको गॅलेगो याने ही चाल रचली. त्याच्या पासवर ब्राऊनने मारलेला चेंडू अर्शदीपच्या दोन्ही पायांमधून नेटमध्ये गेला.

त्यानंतर 24व्या मिनिटाला गॅलेगोच्या चालीवर मॅचादोने ताकदवान हेडिंगवर लक्ष्य साध्य केले.

पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत ओदिशाने अखेर खाते उघडले. आघाडी फळीतील डॅनिएल लाल्हीम्पुईया याने गोलक्षेत्रालगत चाल रचली. त्याने दिलेल्या पासवर इनमन याने फटका मारला. त्यावेळी चेंडू नॉर्थईस्टचा बचावपटू माशूर शेरीफ याच्या पायाला लागून गोलरक्षक शुभाशिष रॉय याच्या डोक्यावरून नेटमध्ये गेला.

महत्त्वाच्या बातम्या –

आयएसएल २०२०-२१ : सुपर सब इशानमुळे गोव्याने चेन्नईयीनला रोखले

ऐतिहासिक! सोशल मीडियावर ५०० मिलियन फॉलोअर्स असणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील पहिलाच खेळाडू

आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून बेंगळुरू पराभूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---