बलाढ्य न्यूझीलंड संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत बुधवारी (दि. 18 ऑक्टोबर) विजयी चौकार मारला. न्यूझीलंडने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडलेल्या स्पर्धेच्या 16व्या सामन्यात अफगाणिस्तानचा 149 धावांनी दारुण पराभव केला. हा अफगाणिस्तानचा स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला. या पराभवानंतर अफगाणी कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी खूपच निराश झाला. त्याची प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.
सामन्यानंतर हशमतुल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) याने म्हटले की, त्यांचे क्षेत्ररक्षण खूपच खराब राहिले. तसेच, खेळपट्टी खूपच संथ वाटत होती, त्यामुळे पहिली गोलंदाजी घेतल्याचेही त्याने बोलून दाखवले.
‘आम्ही खराब क्षेत्ररक्षण केले’
तब्बल 149 धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारणारा कर्णधार शाहिदी म्हणाला, “या स्तरावर तुम्हाला झेल पकडावे लागतात. आमचे क्षेत्ररक्षण खूपच खराब होते आणि आम्ही झेल सोडल्यामुळे सामन्यात खूपच मागे राहिलो. अखेरच्या 6 षटकात न्यूझीलंडने खूप जास्त धावा केल्या आणि आम्ही त्यांना रोखू शकलो नाहीत. आम्ही प्रयत्न केला, पण अयशस्वी ठरलो. ही खेळपट्टी संथ वाटत होती, त्यामुळे मी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अजूनही बरेच साखळी सामने बाकी आहेत आणि आम्ही त्या सामन्यात क्षेत्ररक्षण सुधारण्याचा प्रयत्न करू.”
अफगाणिस्तानचे खराब प्रदर्शन
या सामन्याविषयी बोलायचं झालं, तर न्यूझीलंडने खूप चांगली सुरुवात केली नव्हती. त्यांना 34 धावांवरच डेवॉन कॉनवेच्या रूपात पहिला धक्का बसला होता. त्यानंतर विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी डाव सांभाळला आणि धावसंख्या 100च्या पार नेली. यंगने 54 धावा केल्या. तसेच, रचिन 32 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार टॉम लॅथम याने 68, तर ग्लेन फिलिप्स याने सर्वाधिक 71 धावा केल्या. यादरम्यान अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी अनेक झेल सोडले. त्यांच्या खराब प्रदर्शनामुळेच न्यूझीलंड 288 धावा करू शकला.
या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघ खास कामगिरी करू शकला नाही. त्यांनी 34.4 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 139 धावाच केल्या. यावेळी अफगाणिस्तानकडून रहमत शाह यानेच सर्वाधिक 36 धावा केल्या, तर अझमतुल्लाह उमरजाईने 27 धावांचे योगदान दिले. इकराम अलिखिल 19 धावांवर नाबाद राहिला. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणीही मोठी चांगले प्रदर्शन करू शकले नाही. यावेळी न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि लॉकी फर्ग्युसन यांनी शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स नावावर केल्या.
आता अफगाणिस्तान संघाला पुढील सामन्यात 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी भिडायचे आहे. या सामन्यात अफगाणिस्तान विजय मिळवून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. (nz vs afg captain hashmatullah shahidi statement after lose match world cup 2023)
हेही वाचा-
अफगाणिस्तानला तब्बल 149 धावांनी हरवल्यानंतर काय म्हणाला टॉम लॅथम? भारताबद्दलही केलं लक्षवेधी भाष्य
नाद करायचा नाय! विराटला स्लेज करायला घाबरतो बांगलादेशचा ‘हा’ मुख्य खेळाडू, म्हणाला, ‘तो खूपच…’