भुवनेश्वर। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बाद फेरी गाठण्याच्या आशा ओदीशा एफसीने कायम राखल्या आहेत. शुक्रवारी येथील कलिंगा स्टेडियमवर ओदीशाने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला 2-1 असे हरविले.
मध्यंतराची एका गोलची पिछाडी भरून काढत ओदीशाने दुसऱ्या सत्रात पारडे फिरविले. मार्टिन चॅव्हेजच्या गोलमुळे नॉर्थईस्टने मध्यंतरास 1-0 अशी आघाडी घेतली होती, पण दुसऱ्या सत्रात मॅन्यूएल ओन्वू आणि पेरेझ ग्युडेस यांनी ओदीशाला विजयी केले. बेंगळुरू एफसीकडून लोनवर घेतलेल्या ओन्वूने ओदीशा संघाच्या अपेक्षा सार्थ ठरविल्या.
ओदीशाने एक क्रमांक प्रगती करीत पाचवे स्थान गाठले. ओदीशाने 17 सामन्यांत सातवा विजय मिळविला असून तीन बरोबरी व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 24 गुण झाले. त्यांनी चेन्नईयीन एफसीला मागे टाकले, पण चेन्नईयीनचे दोन सामने कमी झाले आहेत. 15 सामन्यांतून सहा विजय, चार बरोबरी व पाच पराभव अशा कामगिरीसह चेन्नईयीनचे 22 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे.
एफसी गोवा (17 सामन्यांतून 36), एटीके एफसी (16 सामन्यांतून 33) आणि बेंगळुरू एफसी (16 सामन्यांतून 29) या तीन संघांचे बाद फेरीतील स्थान नक्की झाले आहे. चौथ्या स्थानासाठी मुंबई सिटी एफसी (17 सामन्यांतून 26), ओदीशा एफसी (17 सामन्यांतून 24) आणि चेन्नईयीन एफसी (15 सामन्यांतून 22) यांच्यात चुरस आहे. यात मुंबई व ओदीशाचा प्रत्येकी एकच, तर चेन्नईयीनने तीन सामने बाकी आहेत.
खाते उघडण्याची शर्यत नॉर्थईस्टने जिंकली. फ्री-किकवर हा गोल झाला. यात फेडेरीको गॅलेगो याची चपळाई महत्त्वाची ठरली. त्याने मध्य रेषेनजिक अत्यंत वेगाने फ्री-किक घेतली. त्याचवेळी त्याने मार्टिनच्या हालचाली टिपल्या. गॅलेगोने आपल्या दिशेने चेंडू मारताच मार्टीननेही अचूक फिनिशींग करताना ओदीशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याला चकविले.
दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी ओदीशाने बरोबरी साधली. मध्य फळीतील झिस्को हर्नांडेझ याने ही चाल रचत नंदकुमार शेखरला पास दिला. त्याच्याकडून क्रॉस पास मिळताच ओन्वूने सफाईदार फिनिशींग केले. ओन्वूने उजव्या पायाने मारलेला चेंडू नॉर्थईस्टचा गोलरक्षक शुभाशिष रॉयला अडविता आला नाही.
ओदीशाचा दुसरा गोल सेट-पीसवर झाला. डाव्या बाजूला मिळालेला कॉर्नर हर्नांडेझने घेतला. त्यावर ओन्वूने गोलक्षेत्रात उडी घेत हेडींगद्वारे चेंडूला दिशा दिली. हा चेंडू आपल्या दिशेने येताच ग्युडेसने संतुलन साधत मैदानावर झेपावत लक्ष्य साधले. नेटपाशी नॉर्थईस्टच्या रे़डीम ट्लांगने चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू गोलरेषेच्या पलिकडे गेला होता. पंचांनी सहायक पंचांचे मत जाणून घेत गोलचा निर्वाळा दिला.