एटीके-चेन्नईयीन यांच्यात आज महत्त्वाची लढत

कोलकता। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) रविवारी येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर एटीके एफसी आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात लढत होत आहे. एटीकेला आघाडीसाठी, तर चेन्नईयीनला बाद फेरीसाठी विजयाची गरज असेल. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होईल.

एटीकेचा बाद फेरीतील प्रवेश नक्की झाला असला तरी एएफसी चँपीयन्स लिगमधील स्थानासाठी त्यांना आघाडीची गरज आहे. चेन्नईयीनला बाद फेरीची चांगली संधी आहे. त्यांचा सहावा क्रमांक आहे. त्यांचे 22 गुण आहेत. जिंकल्यास ते पाचव्या क्रमांकावरील ओदीशाला मागे टाकू शकतील.

चेन्नईयीनला हरविल्यास एटीके सलग पाचवा विजय मिळवेल. दोन वेळच्या माजी विजेत्यांसाठी रॉय कृष्णा याने दमदार खेळ केला असून सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील. फिजीचा हा खेळाडू 13 गोलांसह गोल्डन बूटच्या शर्यतीत संयुक्त आघाडीवर आहे.

मागील सामन्यात ओदीशाविरुद्ध हॅट््ट्रीक केल्यामुळे त्याचे मनोधैर्य आणखी उंचावले आहे. त्यामुळे चेन्नईयीनच्या एली साबिया आणि ल्युचीयन गोएन यांच्यासमोर कृष्णाला रोखण्याचे कडवे आव्हान असेल.

डेव्हीड विल्यम्स पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून कृष्णाबरोबर त्याची जोडी कशी जमते हे महत्त्वाचे असेल. हे दोघे एकमेकांना तोलामोलाची साथ देतात. त्यांच्यातील समन्वय आणि भागिदारी कोणत्याही बचाव फळीसाठी डोकेदुखी ठरते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रबीर दास आणि मायकेल सुसैराज दोन्ही बाजूंनी सक्रीय असतील. ते मैदानावर शक्य तेवढी मोकळीक मिळविण्याचा प्रयत्न करतील.

एटीकेचे प्रशिक्षक अँटोनिओ हबास यांनी सांगितले की, आमचा संघ चांगल्या स्थितीत आहे. आमची कामगिरी सकारात्मक होत आहे, पण आम्हाला सातत्य कायम राखावे लागेल. आता आमचा प्रतिस्पर्धी चेन्नईयीन आहे. आम्हाला जिंकण्यासाठी खेळावे लागेल. हा सामना चांगला होईल, कारण दोन्ही संघ चांगला खेळ करतात. प्रत्येक सामन्यासाठी एकच ध्येय असते आणि ते म्हणजे जिंकणे.

कृष्णा याला प्रत्युत्तर म्हणून चेन्नईयीन संघाकडे हांगेरीचा स्ट्रायकर नेरियुस वॅल्सकीस असेल. वॅल्सकीस याने 12 गोल केले आहेत आणि तो कृष्णा याचा पाठलाग करतो आहे. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईयीन संघाने केलेल्या पुनरागमन मोहिमेचा प्रमुख मानकरी वॅल्सकीस ठरला आहे.

त्याने पाच गोल करण्यात सुद्धा योगदान दिले आहे. आगुस्टी न लोपेझ नसल्याने एटीके संघाच्या बचाव फळीला फॉर्मातील ह्या खेळाडूला रोखण्यासाठी दक्ष राहावे लागेल.

कॉयल यांनी सांगितले की, एटीके आघाडीसाठी तीन गुण मिळावे म्हणून खेळेल, तर आम्हाला बाद फेरीच्या नाजिक जायचे आहे. त्यांचा संघ चांगला आहे आणि आमचा संघ सुद्धा चांगला संघ आणि चांगले खेळाडू आहेत ह्याची त्यांना कल्पना असेल अशी मला खात्री आहे. आम्ही सर्वोत्तम खेळ करू शकतो असे आम्ही दाखवून दिले आहे.

आम्ही कोणत्याही बचाव फळीसमोर आव्हान निर्माण करू शकतो हे सिद्ध केले आहे आणि उद्या हेच करण्याचा आमचा निर्धार असेल. एटीके संघाचा आम्हाला असे वाटतो, पण इथे येऊन खेळण्याची आम्हाला भिती वाटत नाही. जिंकण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

You might also like