टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये कुस्ती या खेळात भारतीय कुस्तीपटू रवी दहियाने रौप्य पदक जिंकले आहे. दरम्यान उपांत्य सामन्यात त्याचा प्रतिस्पर्धी असलेला कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरिस्लाम सनायेवने त्याच्या दंडाला चावा घेतला होता. मात्र संधी मिळताच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सनायेव रवीची माफी मागितली होती. रवीने स्वतः याबाबत खुलासा केला आहे. त्याने ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला आहे.
रवी म्हणाला की, ‘दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही आमचे वजन करायला गेलो होतो; तेव्हा सनायेव माझ्याआधीच तिथे आला होता. त्याने माझ्याकडे येऊन हातात हात मिळवला. मीही त्याला नमस्कार केला. कारण मी सर्व काही विसरलो होतो. मग त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला की, मला माफ कर भाऊ. मी चुकलो. यावर मी हसून त्याला पुन्हा मिठी मारली. त्याक्षणी आमच्यात चांगली मैत्री जुळली. आम्ही इतर मुद्द्यांवरही विनोद केला.’
सनायेवच्या कृतीवर पुढे बोलताना रवी म्हणाला की, ‘कुस्तीमध्ये लोक मारामारीपर्यंत उतरतात, ही छोटीशी बाब आहे. कोणीतरी मला चावले आहे हे मी मॅटवरच विसरून गेलो होतो. मला वेदना होत राहिल्या. पण मला चावणाऱ्या कझाकिस्तानच्या कुस्तीपटूवर मला कधी राग आला नाही.’
रवीच्या उजव्या हातावर सनायेवचे चावलेले दात अजूनही स्पष्टपणे दिसत आहेत. टोकियो ऑलिंपिकच्या उपांत्य सामन्यात सनायेव रवीचा प्रतिस्पर्धी होता. स्वत:ला पराभूत होताना पाहून सनायेवने त्याच्या हाताला जोरात चावा घेतला होता. तेव्हा रवी देखील आश्चर्यचकित झाला होता. पण वेदना विसरून त्याने कुस्तीच्या डावपेचांवर लक्ष केंद्रित केले आणि उपांत्य सामन्यात सनायेवचा पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते.
मात्र रवी अंतिम फेरीत रशियन कुस्तीपटू जावूर उगेव्हकडून ४-७ अशा फरकाने पराभूत झाला आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. यासह रवी भारतासाठी ऑलिम्पिक रौप्य पदक जिंकणारा दुसरा कुस्तीपटू ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
चंदेरी यश! रवी कुमारच्या नावे ‘रौप्य’; भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळाले पाचवे मेडल
कझाखस्तानी कुस्तीपटूचे लाजिरवाणे कृत्य, चालू सामन्यात रवी दहियाला चावला; झाली सडकून टीका