क्रिकेट जगतात आजचा दिवस म्हणजेच १६ मार्च खास आहे. आजच्याच दिवशी कसोटी क्रिकेटच्या इतिसाहातील सर्वात वेगवान द्विशतक केले गेले होते. तसेच आजचाच दिवस आहे, जेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात संथ गतीचे द्विशतक केले गेले होते. या दोन खेळाडूंंनी हे द्विशतक केले, त्यातील वेगवान द्विशतक करणारा स्वतःच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता, तर संथ गतीने खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूने संघाचा पराभव टाळला होता.
हे दोन्ही सामने १६ मार्च १९९८ आणि १६ मार्च २००० मध्ये खेळले गेले होते. सर्वप्रथम माहिती घेऊन भारतीय खेळाडूने १६ मार्च १९९७ मध्ये केलेल्या सर्वात संथ गतीच्या द्विशतकाविषयी. ही कामगिरी केली होती नवजोत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी. नवजोत सिंग सिद्धू यांच्या कारकिर्दीतील हे एकमात्र द्विशतक होते. हा सामना वेस्ट इंडीजविरुद्ध होता आणि सिद्धू यांनी यामध्ये २०१ धावा केल्या होत्या. ही कामगिरी करण्यासाठी सिद्धू ६७३ मिनिटांपर्यंत खेळपट्टीवर खेळत होते. त्यांनी ४९१ चेंडूंचा सामना केला आणि १९ चौकारांसह एक षटकाराच्या मदतीने हे द्विशतक ठोकले.
मिनिटांच्या आधारावर विचार केला, तर त्यावेळी हे कसोटी क्रिकेटमधील सर्वात संथ गतीने केले गेलेले दुसरे द्विशतक होते. चेंडूंच्या आधारावर विचार केला, तर हे ५ व्या क्रमांकाचे संथ गतीचे द्विशतक होते. असे असले तरी, १९९९ मध्ये गॅरी कर्स्टनने मिनिटांच्या आधारावर संथ गतीचे द्विशतक करण्यांमध्ये दुसऱ्या क्रमांक पटकावला आणि सिद्धू तिसऱ्या क्रमांकावर घसरले.
आता विचार करूयात २००० साली न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या ख्राइस्टचर्चमधील कसोटी सामन्याचा. या सामन्यात न्यूझीलंड संघासमोर ५५० धावांचे लक्ष्य ठेवले गेले होते. न्यूझीलंडने पाचव्या दिवसाच्या दुपारच्या जेवणापर्यंत ३ विकेट्सच्या नुकसानावर १२५ धावा केल्या होत्या. त्यानंतर नॅथन एस्टल मैदानात उतरला आणि १५३ चेंडूत सर्वात वेगवान द्विशतक ठोकले. त्याने या सामन्यात २२२ धावा केल्या. परंतु न्यूझीलंड संघ ४५१ धावांवर सर्वबाद झाला. नॅथन एस्टलच्या रूपात संघाला शेवटचा झटका लागला आणि न्यूझीलंडने ९८ धावांनी पराभव पत्करला.
महत्वाच्या बातम्या –
भारत व इंग्लंडकडून कसोटी सामने खेळणारा ‘हा’ एकमेव क्रिकेटपटू माहित आहे का?