---Advertisement---

…आणि 17 वर्षांपूर्वी केलेल्या ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला

---Advertisement---

एमएस धोनी म्हटलं की प्रत्येकाला आठवतो तो हॅलिकॉप्टर शॉट, लांबलचक फटके आणि 2011चा वनडे विश्वचषकाचा विजयी षटकार. धोनीने त्याच्या याच आक्रमक शैलीमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. याबरोबरच एमएस धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून मानला जातो. भारताने टी20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वनडे विश्वचषक धोनीच्याच नेतृत्वाखाली जिंकला. पण ही सर्व ओळख मिळवण्याआधी धोनीने बरोबर सतरा वर्षांपुर्वी एक खेळी केली होती, ज्यामुळे धोनी हा सर्वांना माहित झाला आणि केवळ माहितच नाही तर सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला.

आजपासून बरोबर सतरा वर्षांपुर्वी 2005 मध्ये 31 ऑक्टोबरला भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने वनडेत श्रीलंकेविरुद्ध जयपुरला नाबाद 183 धावांची खेळी केली होती. धोनीची ही वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली.

2005 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेविरुद्ध भारताने 7 सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. या मालिकेतील तिसरा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडला होता.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 298 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर 299 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. भारताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची विकेट 7 धावांवरच गमावली होती.

पण त्यानंतर मात्र तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या धोनीने पहिले सात चेंडू खेळल्यानंतर चामिंडा वासच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला आणि श्रीलंकेला तो मैदानात आल्याची जणू चेतावणी दिली.

धोनीने या सामन्यात सुरुवातीला सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग बरोबर 92 धावांची भागीदारी रचली. पण मुथय्या मुरलीधरनने सेहवागला 39 धावांवर बाद केले आणि ही जोडी फोडली. पण सेहवागच्या विकेटचा परिणाम होऊ न देता धोनीने त्याचा खेळ सुरु ठेवला.

त्याने त्यावेळीचा भारताचा कर्णधार राहुल द्रविड बरोबर तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. द्रविड 28 धावांवर बाद झाल्यानंतर धोनीने युवराज सिंगला साथीला घेत चौथ्या विकेटसाठी 65 धावा जोडल्या.

पण भारतीय संघ विजयाच्या समीप असताना तिलत्करने दिलशानने युवराजला बाद केले. पण अखेर धोनी आणि वेणूगोपाल रावने भारताला 303 धावांचा टप्पा गाठून दिला आणि भारताला विजयही मिळवून दिला.

या सामन्यात धोनीने 145 चेंडूत तब्बल 15 चौकार आणि 10 षटकारांसह तुफानी खेळ करताना नाबाद 183 धावांची दिडशतकी खेळी केली होती. त्याच्या या खेळीने भारताला या सामन्यात 23 चेंडू राखून आणि 4 विकेट्सच्या मोबदल्यात विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

धोनीची ही खेळी आजही अनेक क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहे. धोनीचे हे वनडे कारकिर्दीतील दुसरेच शतक होते. तसेच यष्टीरक्षक फलंदाजाने वनडेमध्ये केलेली ही सर्वोच्च खेळीही ठरली होती. 2019मध्ये धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. हा विक्रम आजही त्याच्याच नावावर आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर अशी बनलीत उपांत्य फेरीची समीकरणे; भारत-पाकिस्तानला…
तीन षटकार मारून मिलरने संघाला विजयी केलं, पण रोहितच्या विक्रमाला धक्का लावण्यात ठरला अपयशी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---