सचिन, २०० धावांची खेळी आणि आम्ही…

-निलेश पवार

ते कॉलेजचे शेवटचे दिवस होते. पदविच्या शेवटच्या वर्षाची परिक्षा दोन महिन्यांवर आली होती. आम्हाला वेध लागले होते ते अभ्यासाचे. वर्षभर केला नाही व कळत नाही म्हणून अगोदरपासुन एका हुशार मित्राला सोबत घेवुन एकत्र मिळून अभ्यास करायचे ठरवलेले. मी व माझे दोन मित्र औदुंबर व सचिन (अभ्यासात हुशार) गच्चीवर अभ्यास करायचो.

दक्षिण अफ्रिका २००९-१० साली भारत दौर्‍यावर होती. दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत सुटली होती. सचिनने दोन्ही सामन्यात शतक ठोकले होते. आता वेळ होती एकदिवसीय सामन्यांची. पहिल्या सामन्यात फक्त ४ धावा करुन फॉर्ममध्ये असलेला सचिन धावबाद झाला होता. परंतु भारताने अटीतटीचा सामना १ धावेने जिंकला.

त्याकाळी स्मार्टफोन न्हवते त्यामुळे एफएम समालोचन ऐकत अभ्यास चालू होता. २४ फेब्रुवारी २०१०- दुसरा सामना होता ग्वाल्हेरच्या कॅप्टन रुप सिंग मैदानात. कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकली व फलंदाजी घेतली. या मालिकेत उतरलेला अफ्रिकेची हा आतापर्यंतचा सर्वोत्तम संघ होता. स्टेन, पर्नेल, कॅलिस, लॅन्गवेल्ड, ड्युमिनी यासारखे घातक गोलंदाज त्यांच्याकडे होते.

सेहवाग व सचिन फलंदाजीसाठी उतरले. सेहवाग फक्त ९ धावा काढुन बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिक आला. सुरुवातीला दोघेही सावधपणे खेळत होते. स्थिरावल्यानंतर दोघांनीही आक्रमक पवित्रा घेतला. आणि बघता बघता सचिनने आपले ४६ वे एकदिवसीय शतक ९० चेंडूत पुर्ण केले. संघाची धावसंख्या २८ षटके १७६/१ अशी होती. आज सचिन वेगळ्याच लयीत होता. कार्तिकही तेवढीच चांगली साथ देत होता. आमचीही आणि अभ्यासाची लय केव्हा तुटली ते कळलच नाही.

३४ व्या षटकात पर्नेलने ही १९४ धावांची भागिदारी फोडली. कार्तिक ७९ धावांवर बाद झाला. युसुफ पठाणही आक्रमक ३६(२३) धावा करुन बाद झाला व कर्णधार धोनी आला. एव्हाना सचिनच्या १५० धावा पुर्ण झाल्या होत्या. वेध लागले होत ते अन्वर व कॉवेटरी यांच्या नावावर असलेला १९४ धावांचा विक्रम मोडण्याचा.

पुढच्या काही षटकातच आक्रमक फलंदाजीने सचिनने स्वतःचा १८६ धावांचा विक्रम मोडला. आता तर आम्ही वह्यापुस्तके बंद करुन ठेवली होती. तिघेही क्रिकेटवेडे त्यामुळे एकमेकांची संमती लगेच मिळाली.

आणि सचिन १९० झाल्यावर मात्र त्याला हालचाल करण्यास अडचण येत होती. पायाला क्रॅम्प आले. यावेळी धोनीने आक्रमक पवित्रा घेतला व पुढच्या काही षटकात अफ्रिकेची पळताभुई थोडी केली. परंतु सर्वांची नजर होती ती सचिनच्या द्विशतकावर कारण सचिनने १९४ धावांचा विक्रम लिलया पार केला होता.
परंतु धोनीच्या फटक्यांमुळे सचिनला फार कमी वेळा फलंदाजी मिळत होती. प्रेक्षकांचा व आमचाही संयम सुटत होता. एवढे चांगले खेळूनही धोनीला आम्ही शिव्याच घालत होतो. वाईट बोल ऐकण्याची ही त्याची पहिलीच वेळ असावी. ४९ वे षटक संपले सचिन १९९ वर खेळत होता. आता खरी परिक्षा होती आमचीही उत्सुकता ताणली गेली.

धोनीने ५० व्या षटकात परत एक षटकार खेचला, परंतु लोकांना त्याचा आता खुप राग आला होता आणि शेवटी ती वेळ आलीच सचिन स्ट्राईकवर आला व ५० व्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर सचिनने एक धाव घेतली व अक्षरशः जिवात जीव आला.

वनडेत २०० धावा करणारा सर्वात पहिला फलंदाज हा किताब “सचिन रमेश तेंडूलकर” या अवलियाने आपल्या नावावर केला होता.

आज जवळपास १० वर्षानी ती खेळी आठवताना खरच भरुन आलय व अंगावर काटा उभा राहीलाय. धन्य तो सचिन ! असे अविस्मरणीय क्षण आयुष्यात आणल्याबद्दल खुप खुप आभारी.

You might also like