श्रीलंकेचा ५ फूट ७ इंच उंची असणारा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याचा आज (१७ एप्रिल) वाढदिवस. त्याचा जन्म १७ एप्रिल १९७२ मध्ये श्रीलंकेच्या कॅंडी येथे झाला होता. मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये असा विक्रम केला आहे, जो मोडणे जवळपास अशक्य दिसते.
त्याने कसोटीत एकूण १३३ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २२.७२ च्या सरासरीने एकूण ८०० विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ३५० वनडे सामने खेळताना एकूण ५३४ विकेट्स घेतल्या आहेत. हा देखील एक विक्रम आहे.
मुरलीधरनला आपल्या कसोटी कारकीर्दीत केवळ ८० विकेट्सच घेता आल्या असत्या. जेव्हा १९९५ मध्ये डेरल हेयरने मेलबर्नच्या मैदानावर त्याच्या गोलंदाजीवर सतत नो-बॉल दिले होते, त्यावेळी अर्जुन रणतुंगाने मुरलीधरनची खूप मदत केली होती. यातून मुरलीधरन सहिसलामत बाहेर आला.
श्रीलंकेचा माजी कर्णधार दिलीप मेंडिसने (Dilip Mendis) एकदा मुरलीधरनची प्रशंसा करत म्हटले होते की, सिमेंटच्या मैदानावरही फिरकी चेंडू टाकण्याची क्षमता त्याच्यात आहे. तो आपले मनगट खूप जोरात फिरवत होता. त्याने सर्वाधिक वेळा ६७ वेळा कसोटीच्या एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने कसोटी कारकीर्दीत २२वेळा १० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. हा देखील एक विक्रम आहे.
२०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा मुरलीधरन अनिर्णित आणि पराभूत कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. मुरलीधरनने ८०० पैकी ३६२ विकेट्स पराभूत आणि अनिर्णित कसोटी सामन्यांमध्ये घेतल्या आहेत. तसेच त्याने वनडेत १० वेळा ५ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा विकेट्स घेतल्या आहेत.
मुरलीधरनने जुलै २०१०मध्ये आपल्या कारकीर्दीतील शेवटचा कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला होता. तसेच त्याने प्रज्ञान ओझाची विकेट घेत आपल्या ८०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
याव्यतिरिक्त मुरलीधरनने आयपीएलमध्ये अनेक संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २००८मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर कोची टस्कर्स केरळ आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडूनही खेळला आहे. त्याचबरोबर सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक बनला होता.