-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund)
सोळा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी इंग्लंडने लॉर्ड्सवर भारतीय गोलंदाजांचा बाजार केला. नासिर हुसेनने वनडे मधले आपले एकमेव शतक याच सामन्यात केले. शतक पूर्ण केल्यानंतर त्याने इंग्लंडच्या पॅव्हेलीयनकडे बघत आपल्या पाठीवरचे नाव दाखवत आपणही मोठी खेळी करू शकतो असे हावभाव केले. त्याला ट्रेस्कॉथिकने शतक करत सुरेख साथ दिली. एकाच सामन्यात दोन फलंदाजांनी शतक करण्याची इंग्लंडची ही केवळ दुसरी वेळ होती. नेहराजी, झहीर, भज्जी आणि अगदी कुंबळेचीसुद्धा त्यांनी धुलाई केली. डाव संपला तेव्हा इंग्लंडच्या खात्यात ३२५ धावा होत्या.
एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आणि तोही इंग्लंडमध्ये, म्हणजे भारत हरणार हे अनेकांनी गृहीत धरले आणि झोपी गेले. भारतीय क्रिकेटमधील एका ऐतिहासिक क्षणाला आपण मुकणार आहोत याची त्यांना तेव्हा कल्पनाही नव्हती.
माझ्यातला क्रिकेटरसिक मला झोपू देत नव्हता. भारत जिंकेल अशी आशा धरून मी भारताची फलंदाजी पाहू लागलो. सेहवाग आणि दादाने भारताचा डाव सुरू केला. एरवी तोडफोड करणारा
सेहवाग त्या दिवशी चक्क बघ्याच्या भूमिकेत होता. दादाच्या डोक्यात त्या दिवशी वेगळंच काहीतरी होतं. सुरुवातीची काही षटके खेळून काढल्यानंतर दादाने आपले आक्रमण सुरु केले. प्रत्येक षटकात एक तरी चौकार मारायचा या हिशोबाने त्याने धावसंख्येला वेग देण्यास सुरुवात केली. ‘लिडिंग फ्रॉम फ्रंट’सारखं तो इंग्लडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला करू लागला. विशेषतः फ्लिंटॉफकडे त्याने आपला मोर्चा वळवला आणि त्याच्या पहिल्या ३ षटकांत २५ धावा काढल्या. सेहवागनेही मागे न राहता रॉनी इरानीच्या एकाच षटकात चार चौकार फटकावले. भारताची सुरुवात जोरदार होऊन दादा मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच तो बाद झाला. त्यांनंतर लगेचच थोड्या थोड्या अंतराने सेहवाग, दिनेश मोंगिया (याच्याबद्दल लिहीन कधीतरी),द्रविड परतले. तेंडुलकर मात्र अजूनही मैदानावर होता. त्या मालिकेत सचिन फॉर्मात होता. त्याने दोन शतकेही काढली होती. त्यामुळे अनेकांना अजूनही भारत जिंकण्याची आशा होती. मात्र अॅशले जाईल्सचा स्टंपवर जाणारा एक चेंडू मारण्याच्या नादात सचिन बाद झाला. सचिन बाद म्हणजे मॅच खिशात अशा आविर्भावात इंग्लंडच्या संघाने आनंद व्यक्त करायला सुरुवात केली.
भारतीय संघात जिंकण्याची वृत्ती निर्माण करण्याचे श्रेय गांगुलीला जाते. या सामन्यात सलामीला येऊन वेगवान अर्धशतक काढत त्याने आपले काम चोख बजावले होते. याच गांगुलीला सेहवाग, झहीर, हरभजन, युवराज, कैफ अशा तरुण पोरांना प्रकाशझोतात आणण्याचेही श्रेय जाते. लॉर्ड्सवरच्या या सामन्यात हे सगळे खेळत होते. तेंडुलकर बाद झाल्यानंतर अगोदरच मैदानात असलेल्या युवराजच्या साथीला कैफ आला. मला का कोण जाणे त्या दिवशी भारत जिंकेलच अशी आशा वाटत होती. नवखे युवराज आणि कैफ खेळत असूनही मी मॅच पहात राहिलो.
एकेरी दुहेरी धावा घेत युवराज आणि कैफने भारताचा डाव सुरु ठेवला. खराब चेंडूंना शासन करत त्यांनी धावगती आवाक्याबाहेर जाणार नाही याचीही काळजी घेतली. युवराजने अर्धशतक पूर्ण केले तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवलेला गांगुली लॉर्डसच्या बाल्कनीमध्ये उभा राहून टाळ्या वाजवत होता. युवराजपाठोपाठ कैफनेही आपले अर्धशतक साजरे केले. हे दोघेच आता भारताला सामना जिंकून देतील असे वाटत असताना युवराज कॉलिंगवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांच्या आशा मावळल्या. पॅव्हेलियनकडे परतत असताना आपल्या हातून एक मोठी कामगिरी अर्धवट राहिली असे भाव युवराजच्या चेहऱ्यावर दिसले.
अजूनही जिंकायला ५० हुन जास्त धावांची गरज होती. कैफ हा एकटा फलंदाज मैदानात होता. त्याच्या जोडीला हरभजन आला. आयपीएलमुळे आता हरभजनच्या फलंदाजीवर थोडा भरोसा असला तरी २००२ साली झालेल्या या सामन्यात तसे अजिबात नव्हते. तरीही हरभजनला हाताशी धरून कैफने भारताला विजयाकडे घेऊन जाण्यास सुरुवात केली. ‘ढवळ्याशेजारी बांधला पवळा’प्रमाणे हरभजननेदेखील एक षटकार मारून आपले योगदान दिले. एव्हाना टीव्हीसमोर लोळत पडलेला मी आता खुर्चीत येऊन बसलो. नवख्या पोरांनी आपल्या तोंडाला फेस आणला हे जाणलेल्या नासिर हुसेनचे डोके चालेनासे झाले.
कैफने मॅच काढली असे वाटत असतानाच फ्लिंटॉफने एकाच षटकात हरभजन आणि कुंबळेला बाद केले. परत एकदा भारत हारतो की काय असे वाटू लागले. कैफने मात्र हार मानली नाही. काहीही करून जिंकायचेच असा चंगच त्याने मनाशी बांधला. १-२, १-२ धावा काढत त्याने सामना आटोक्यात ठेवला. शेवटच्या षटकात २ धावांची गरज होती तरीही भारत जिंकेल याची खात्री वाटत नव्हती. त्यात नेमका झहीर स्ट्राईकवर, त्यामुळे धाव निघण्यापेक्षा बाद होण्याची शक्यता जास्त अशी परिस्थिती. शेवटचे षटक नासिरने त्याचा हुकमी एक्का असलेल्या फ्लिंटॉफला दिले. पहिले दोन चेंडू झहीरने कसेबसे खेळून काढले. त्यातही एका चेंडूवर त्याच्याविरुद्ध झेलबादचे अपिल झाले. काहीही करून कैफला स्ट्राईकवर आणायचे म्हणून तिसरा चेंडू झहीरने तटवला आणि कैफ पळत सुटला. आपण क्रीजमध्ये पोहोचू की नाही अशी धास्ती वाटणाऱ्या त्याने डाइव्ह मारली. इंग्लंडच्या फिल्डरने फेकलेला चेंडू स्टंपला न लागता पलीकडे गेला. कैफने लगेच उठून दुसरी धाव पळून काढली आणि भारत विजयी झाला. कैफबरोबर विजयाचा आनंद साजरा करायला सगळ्यात आधी युवराज गेला. आपल्याकडून अर्धी राहिलेली कामगिरी आपल्या सहकाऱ्याने पूर्ण केली याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता.
मी आनंदाच्या भरात जुने फटाके काढून घरासमोर वाजवले. एरवी रात्री नऊ वाजताच शांत होणाऱ्या आमच्या पेठेत इतक्या रात्री फटाके वाजवल्यावर शेजारीपाजारी दार उघडून बाहेर आले. मला पाहून त्यांनाही प्रश्न पडला की नक्की काय झाले आहे? भारत जिंकला म्हणून फटाके वाजवतोय असे सांगितल्यावर तेही तक्रार न करता झोपी गेले.
तिकडे लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये दादाने आपला टीशर्ट काढून हवेत भिरकावत आनंद साजरा केला. काही दिवस अगोदर मुंबईत वानखेडेवर फ्लिंटॉफने असाच शर्ट काढून इंग्लंडचा विजय साजरा केला होता. गांगुलीने लॉर्ड्सवर त्याला उत्तर देत वानखेडेवरच्या पराभवाचे उट्टे काढले. हा सामना भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणून गणला जातो. याच विजयाने भारताने जगाला आम्हीही परदेशात जिंकू शकतो असे दाखवून दिले. आज या घटनेला १६ वर्षे होऊनही हा विजय अंगावर शहारे आणतो. युवराज आणि कैफ यांच्यातले कसब ओळखून त्यांना पाठिंबा देणाऱ्या गांगुलीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. या सामन्यातील इतर खेळाडू कोणाच्या लक्षात राहोत अथवा न राहोत, शर्ट काढलेला गांगुली मात्र भारतीय क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत.
क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालिकेतील काही खास लेख-
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर