जगभरात ज्या टी२० लीग स्पर्धेची सर्वात जास्त चर्चा रंगते, त्यांपैकीच एक म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग होय. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. २९ मे) पार पडला. या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर याने त्याच्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. तो आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक धावा चोपणारा फलंदाज ठरला.
जोस बटलर (Jos Buttler) याने या हंगामात ८००हून अधिक धावांचा पाऊस पाडला. या धावांसह त्याने ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली. हे झालं या हंगामाबद्दल, पण तुम्हाला आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणकोणत्या खेळाडूला ऑरेंज कॅप मिळाली आहे, हे माहितीये का? या लेखातून आपण त्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया… (Orange Cap Holders In IPL History)
#आतापर्यंत आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावणारे फलंदाज –
१. आयपीएल २००८- शॉन मार्श
पंजाब किंग्स संघाचा धडाकेबाज फलंदाज शॉन मार्शने आयपीएल २००८ मध्ये धावांचा पाऊस पाडला होता. त्याने या हंगामात ११ सामने खेळताना ६८.४४ च्या सरासरीने ६१६ धावा कुटल्या होत्या. यादरम्यान त्याने १ शतक आणि ५ अर्धशतके ठोकली होती. यासह तो आयपीएलच्या पहिल्याच हंगामात ऑरेंज कॅप पटकावणारा पहिला खेळाडू ठरला होता.
२. आयपीएल २००९- मॅथ्यू हेडन
चेन्नई सुपर किंग्स संघाचे विस्फोटक फलंदाज मॅथ्यू हेडन यांनी आयपीएल २००९ मध्ये आपल्या फलंदाजीने धुमाकूळ केला होता. त्यांनी या हंगामात १२ सामने खेळताना ५२ च्या सरासरीने ५७२ धावा केल्या होत्या. यामध्ये त्यांनी ५ अर्धशतक ठोकले होते. यासोबतच त्यांनी आयपीएल २००९ मधील ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली होती.
३. आयपीएल २०१०- सचिन तेंडुलकर
मुंबई इंडियन्स संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच आयपीएलमध्येही आपल्या फलंदाजीचा डंका वाजवला आहे. याचा प्रत्यय आयपीएल २०१० मध्ये आला. सचिनने या हंगामात १५ सामने खेळताना ४७.५३ च्या सरासरीने ६१८ धावा ठोकल्या होत्या. यामध्ये त्याच्या ५ अर्धशतकांचा समावेश होता. या धावांच्या मदतीने सचिनने ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली होती.
४. आयपीएल २०११- ख्रिस गेल
आयपीएल २०११ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना ख्रिस गेलने आपल्या फलंदाजीतून आग ओकली होती. त्याने अवघ्या १२ सामने खेळताना ६७.५५ च्या सरासरीने ६०८ धावा केल्या होत्या. या हंगामात गेलने एक नव्हे, तर तब्बल २ शतके ठोकली होती. यासोबतच त्याने ३ अर्धशतकेही आपल्या नावावर केली होती. या कामगिरीच्या जोरावर गेलने ऑरेंज कॅपही आपल्या नावावर केली होती.
५. आयपीएल २०१२- ख्रिस गेल
विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने आयपीएल २०१२ मध्येही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना धुमाकूळ घातला होता. त्याने १५ सामने खेळताना ६१.०८ च्या सरासरीने ७३३ धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने १ शतक आणि ७ अर्धशतके ठोकली होती. या कामगिरीमुळे त्याने सलग दुसऱ्या वर्षीही ऑरेंज कॅप पटकावण्याचा मान पटकावला होता.
६. आयपीएल २०१३- मायकल हसी
चेन्नई सुपर किंग्स संघाचा धडाकेबाज फलंदाज मायकल हसीने आयपीएल २०१३ चा हंगाम आपल्या फलंदाजीने गाजवला होता. त्याने १७ सामने खेळताना ५२.३५ च्या सरासरीने ७३३ धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने ६ अर्धशतके केली होती. यासह तो ऑरेंज कॅपही आपल्या नावावर करण्यास यशस्वी झाला होता.
७. आयपीएल २०१४- रॉबिन उथप्पा
आयपीएल २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना रॉबिन उथप्पाने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच चकित केले होते. त्याने १६ सामने खेळताना ४४ च्या सरासरीने ६६० धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या ५ अर्धशतकांचाही समावेश होता. या कामगिरीमुळे तो ऑरेंज कॅप आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरला होता.
८. आयपीएल २०१५- डेविड वॉर्नर
सनरायझर्स हैदराबाद संघाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नरने आयपीएल २०१५ मध्ये आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडला होता. यामध्ये त्याने सर्वांना आपल्या फलंदाजीची दखल घेण्यास भाग पाडले होते. यामध्ये त्याने १४ सामने खेळताना ४३.२३ च्या सरासरीने ५६२ धावा केल्या होत्या. यामध्ये तब्बल ७ अर्धशतकांचाही समावेश होता. यासह त्याने ऑरेंज कॅपवर आपले नाव कोरले होते.
९. आयपीएल २०१६- विराट कोहली
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने आयपीएल २०१६ चा हंगामात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या हंगामात त्याने केलेली आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या होती. त्याने १६ सामने खेळताना ८१.०८ च्या सरासरीने तब्बल ९७३ धावा केल्या होत्या. यामध्ये विराटने एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल ४ शतके आणि ७ अर्धशतके ठोकली होती. त्याच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे त्याने ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली होती.
१०. आयपीएल २०१७- डेविड वॉर्नर
सनरायझर्स हैदराबाद संघाचा फलंदाज डेविड वॉर्नरने आयपीएल २०१७ मध्येही आपल्या बॅटीतून धावांचा पाऊस पाडला होता. त्याने १४ सामने खेळताना ५८.२७ च्या सरासरीने सर्वाधिक ६४१ धावा कुटल्या होत्या. यामध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश होता. त्याच्या या कामगिरीमुळेच तो ऑरेंज कॅपवर आपले नाव कोरण्यात यशस्वी झाला होता.
११. आयपीएल २०१८- केन विलियम्सन
आयपीएल २०१८ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाच्याच खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या होत्या. तो खेळाडू म्हणजेच केन विलियम्सन होय. त्याने या हंगामात १७ सामने खेळताना ५२.५० च्या सरासरीने तब्बल ७३५ धावा ठोकल्या होत्या. यामध्ये ८ अर्धशतकांचा समावेश होता. आपल्या अप्रतिम कामगिरीमुळे तो या हंगामात ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.
१२. आयपीएल २०१९- डेविड वॉर्नर
आयपीएल २०१७, २०१८ आणि २०१९ या तिन्ही हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी सर्वाधिक धावा कुटल्या होत्या. आयपीएल २०१९ मध्ये डेविड वॉर्नरने १२ सामने खेळताना ६९.२० च्या सरासरीने ६९२ धावा केल्या होत्या. यामध्ये १ शतक आणि ८ अर्धशतके ठोकली होती. यामुळे तो ऑरेंज कॅप आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरला होता.
१३. आयपीएल २०२०- केएल राहुल
पंजाब किंग्स संघाचा कर्णधार केएल राहुलने आयपीएल २०२०मध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित केले होते. त्याने या हंगामात सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने १४ सामने खेळताना ५५.८३ च्या सरासरीने ६७० धावा ठोकल्या होत्या. या धावा करताना त्याने १ शतक आणि ५ अर्धशतके ठोकली होती. यामुळे तो सहजरीत्या आयपीएल २०२० च्या ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.
१४. आयपीएल २०२१- ऋतुराज गायकवाड
चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. त्याने १६ सामने खेळताना ४३.३५ च्या सरासरीने ६३५ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने १ शतक आणि ४ अर्धशतकेही ठोकली.
१५. आयपीएल २०२२- जोस बटलर
आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर याने धावांचा नुसता पाऊस पाडला. त्याने या हंगामात सर्वाधिक धावा करत आणि अनेक विक्रमांना तडा देत ऑरेंज कॅप नावावर केली. विशेष म्हणजे, बटलर हा ऑरेंज कॅप पटकावणारा राजस्थानचा पहिला वहिला खेळाडू ठरला. या दरम्यान खेळताना त्याने १७ सामने खेळताना ५७.५३च्या सरासरीने ८६३ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने ४ शतके आणि ४ अर्धशतकेही झळकावली आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जिंकलस रे भावा! बटलरने गाजवला IPL 2022चा हंगाम, सर्वाधिक धावा करत मोडला वॉर्नरचा भलामोठा विक्रम
फक्त पंड्या अन् ‘या’ भारतीय कर्णधाराला जमलाय IPL Finalमध्ये विकेट घेण्याची किमया, वाचा सविस्तर
कानामागून आला आणि तिखट झाला; एकच चेंडू फेकला आणि उमरान मलिकचं बक्षीस घेऊन गेला






