बांगलादेशने रावळपिंडी कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला. यासह त्यांनी प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानला पराभूत केले. या निकालामुळे पाकिस्तान संघाला गेल्या दोन वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये आणखी एका अपसेटचा सामना करावा लागला आहे. मागील तीन वर्षांपासून पाकिस्तानला कशाप्रकारे नाचक्की सहन करावी लागली? ते आपण पाहूया.
टी20 विश्वचषक 2022
टी20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तान संघ निश्चितपणे अंतिम सामना खेळला होता. मात्र, यापूर्वी त्यांना सनसनाटी पराभवाला सामोरे जावे लागले होते. ग्रुप स्टेज सामन्यात पाकिस्तानचा झिम्बाब्वेविरूद्ध एका धावेने पराभव झाला होता. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद असे फलंदाज असूनही पाकिस्तानी संघ 131 धावांचे लक्ष्यही गाठू शकला नाही आणि पराभूत झालेला.
वनडे विश्वचषक 2023
टी20 विश्वचषकानंतर वनडे फॉरमॅटची वेळ आली आणि यावेळीही पाकिस्तानला वर्ल्डकपमध्येच पराभवाला सामोरे जावे लागले. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानकडून पाकिस्तानचा पराभव झाला होता. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानी संघाने 282 धावा केल्या होत्या आणि अफगाणिस्तानने केवळ 2 विकेट्स गमावून पाकिस्तानचा 8 विकेटने पराभव केला होता. अफगाणिस्तानचा पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमधील हा पहिला विजय ठरला. त्या विश्वचषकात अफगाणिस्तानने इतर संघांना धक्का देत चमकदार कामगिरी केली होती.
टी20 विश्वचषक 2024
दोन महिन्यांपूर्वीच झालेल्या टी20 विश्वचषकात देखील पाकिस्तानला आपल्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा पराभव पहावा लागला होता. अमेरिका क्रिकेट संघाने त्यांना विश्वचषकात पराभूत करण्याची कामगिरी केली होती. यानंतर त्यांना साखळी फेरीतूनच आपला गाशा गुंडाळावा लागलेला.
कसोटी क्रिकेट
या सर्व धक्क्यांमधून सावरत असतानाच आता, बांगलादेशने त्यांना 10 गडी राखून कसोटी क्रिकेटमध्येही पराभूत केले. विशेष म्हणजे पाकिस्तानला प्रथमच 10 गडी राखून कसोटी पराभूत व्हावे लागले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशची पाकिस्तानला पराभूत करण्याची ही पहिली वेळ आहे.
हेही वाचा –
बाबर आझमचा फ्लॉप शो! बांगलादेशच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयामागची 3 कारणं जाणून घ्या
बांगलादेशनं इतिहास रचला! पाकिस्तानची घरच्या मैदानावर नाचक्की
शाकिब अल हसननं पुन्हा संयम गमावला, मैदानावरील या कृतीनं सगळेच हैराण