पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गुरुवारी जय शाह यांच्या नेतृत्वाखाली आयसीसीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीचा कोणताही अजेंडा ठरला नसला तरी ही बैठक चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत असण्याची शक्यता आहे. आयसीसीचे नवनियुक्त अध्यक्ष जय शाह हे या बैठकीचे अध्यक्ष असतील.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं हायब्रीड मॉडेलला सहमती दर्शवली आहे. मात्र, त्यांच्या चार अटी आहेत. ‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार, सुरुवातील विरोध केल्यानंर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं अखेर हायब्रिड मॉडेलला सहमती दर्शवली. हायब्रिड मॉडेलसाठी यूएई हे दुसरं ठिकाण म्हणून उदयास आलं आहे. येथे भारताचे सर्व सामने तसेच उपांत्य सामना आणि अंतिम सामना होईल.
रिपोर्टनुसार, पीसीबीनं हायब्रीड मॉडेल स्वीकारण्याच्या बदल्यात चार-पाच मागण्या केल्या आहेत, परंतु आयसीसी त्या मान्य करेल अशी शक्यता नाही. पीसीबीची मुख्य मागणी आहे की, ज्याप्रमाणे भारतासाठी हायब्रीड मॉडेल आणलं, त्याचप्रमाणे भारतात होणाऱ्या आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तानसाठी हायब्रीड मॉडेल असावं. बीसीसीआयनं ही मागणी फेटाळून लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशा स्थितीत याला मंजुरी मिळणार का, हे पाहणं बाकी आहे. याशिवाय पीसीबीनं पाच सामने देशाबाहेर हलवल्याबद्दल भरपाईची मागणी केली असून या मागणीला विरोध होण्याची शक्यता नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आणखी एक मागणी, जी आयसीसी आणि बीसीसीआयद्वारे फेटाळली जाणं निश्चित आहे, ती म्हणजे भारत, पाकिस्तान आणि अन्य एक देशानं एका तटस्थ ठिकाणी त्रिकोणी मालिका खेळावी. मात्र याबाबत एकमत नाही. आयसीसी आणि बीसीसीआय दोघेही या कल्पनेच्या विरोधात आहेत. 2012 पासून आयसीसी आणि आशियाई स्पर्धा वगळता भारतानं पाकिस्तानशी एकही मालिका खेळलेली नाही.
पीसीबीची आणखी एक मागणी होती की भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवू नये जेणेकरून पाकिस्तान आपले सर्व साखळी सामने मायदेशात खेळू शकेल. मात्र आयसीसीनं हे मान्य केलं नाही. भारत-पाकिस्तान सामन्यातून पैसा मिळतो आणि प्रायोजकही या विचाराच्या विरोधात असल्याचं मानलं जातं. वृत्तानुसार, भारत-पाकिस्तान सामना 1 मार्च रोजी होणार आहे आणि तो बहुधा दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
हेही वाचा –
जसप्रीत बुमराह ॲडलेडमध्ये इतिहास रचणार! फक्त 3 विकेट घेताच मोडेल झहीर खानचा विक्रम
ऑस्ट्रेलियानं धूळ चारली, पहिल्या वनडेत भारतीय संघाचा दारुण पराभव
भुवीचं नाणं अजूनही खणखणीत वाजतंय! जबरदस्त हॅट्ट्रिकसह केली टीकाकारांची बोलती बंद






