पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) खेळली जात आहे. स्पर्धा सध्या खूपच रोमांचक बनली आहे. सोमवारी (२१ फेब्रुवारी) लाहोर कलंदर्स आणि पेशावर जाल्मी (Lahore Qalandars vs Peshawar Zalmi) यांच्यातील सामना सुपर ओव्हरपर्यंत खेळला गेला. पेशावर जाल्मीने अखेर विजय मिळवला. सामन्यात एक असा झेल घेतला गेला, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
सामन्यात पेशावर जाल्मीचा २० वर्षीय खेळाडू मोहम्मद हॅरिस (mohammad haris) याने सीमारेषेजवळ हा झेल घेतला. क्रिकेट जगतात क्वचितच असा झेल यापूर्वी कधी पाहिला गेला असावा. लाहोर कलंदर्सच्या फलंदाजीदरम्यान ही घटना घडली. डावाच्या सहाव्या षटकात पेशावरचा अरशद इकबाल गोलंदाजीसाठी आला. इकबालच्या षटकातील तिसरा चेंडूवर फलंदाजी करणारा कामरान गुलाम (kamran ghulam) याने एक मोठा शॉट मारला, पण चेंडू नीट बॅटवर बसला नाही.
परिणामी चेंडू हवेत वर गेला आणि हवेत जास्त वेळ राहिला. अशात पेशावरचे दोन क्षेत्ररक्षक झेल पकडण्यासाठी धावले. याच वेळी मैदानात एक अनोखा योगायोग पाहायला मिळाला. पाकिस्तानी खेळाडू क्षेत्ररक्षण करताना चुका करण्यासाठी ओळखले जातात, पण यावेळी खेळाडूंनी चूक केली नाही. कामरान गुलामने मारलेला हा हवेतील शॉट आधी ३० यार्डच्या आतमधील एका खेळाडूने पकडण्याचा प्रयत्न केला, पण उलट्या दिशेने धावत असल्यामुळे त्याला तो झेलता आला नाही. त्या खेळाडूच्या हातातून चेंडू निसटताच मोहम्मद हॅरिसने झेप मारली आणि हा अप्रतिम झेल घेतला. हॅरिसने घेतलेला हा उत्कृष्ट झेल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
CATCH OF THE MATCH BY @iamharis63 😲#HBLPSL7 l #LevelHai l #LQvPZ pic.twitter.com/3ic5oqNyDe
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 21, 2022
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर दोन्ही संघांनी २० षटकांमध्ये प्रत्येकी १५८ आणि १५८ धावा केल्या होत्या. त्यानंतर सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना लाहोर कलंदर्सने एका षटकात पाच धावा केल्या आणि पेशावर जाल्मीला सहा धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात पेशावर संघाने हे लक्ष्य अवघ्या दोन चेंडूत गाठले आणि विजय मिळवला. लाहोरसाठी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने ही सुपर ओव्हर टाकली आणि पेशावरचा अनुभवी फलंदाज शोएब मलिकने लागोपाठ दोन चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या-