पाकिस्तान आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये भाग घेईल की नाही, याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. टी20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका येथे सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) बांगलादेशच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) दुसरे पत्र लिहिणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या पत्रात पीसीबी स्पष्ट करणार आहे की, बांगलादेशला टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर काढल्याने त्यांना मोठी निराशा झाली आहे. जर पाकिस्तानची टीम स्पर्धेत उतरली तर त्यांचे खेळाडू प्रतीकात्मक विरोध म्हणून प्रत्येक सामन्यात दंडावर काळी पट्टी बांधून खेळतील. ‘टेलिकॉम एशिया स्पोर्ट’च्या रिपोर्टनुसार, पीसीबी हे औपचारिक पत्र लवकरच आयसीसीला पाठवणार आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) केली. आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला रिलीज केल्यानंतर बांगलादेशने भारतात सुरक्षेच्या चिंतेने टी20 वर्ल्ड कपचे आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली. आयसीसीने स्वतंत्र सुरक्षा यंत्रणेच्या अहवालानुसार ही चिंता आधारहीन असल्याचे सांगितले आणि बांगलादेशला 24 तासांची मुदत दिली. मात्र, बीसीबीने भारतात न जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयसीसीने बांगलादेशाला बाहेर काढून स्कॉटलंडला त्यांच्या जागी सामील केले.
या निर्णयाने पाकिस्तान संतापला. पीसीबीने यापूर्वीच आयसीसीला पहिले पत्र लिहून बांगलादेशचे समर्थन केले होते आणि त्यांचे सामने पाकिस्तानात खेळवण्याची ऑफर दिली होती. आयसीसी बोर्ड मीटिंगमध्ये फक्त पाकिस्ताननेच बांगलादेशाच्या बाजूने उभे राहिले, पण बहुमताने निर्णय भारतातच सामने खेळवण्याचा झाला.
पीसीबी चेअरमन मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली. भेटीनंतर नक्वींनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, चर्चा चांगली झाली आणि वर्ल्ड कपबाबत अंतिम निर्णय सोमवारपर्यंत (2 फेब्रुवारी) घेतला जाईल.
पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार असल्याने पूर्ण बहिष्काराची शक्यता कमी आहे, पण भारताविरुद्धचा सामना (15 फेब्रुवारी) बहिष्कार किंवा काळी पट्टी असे प्रतीकात्मक विरोध होऊ शकतात. पूर्ण बहिष्कार झाल्यास आयसीसीकडून मोठ्या आर्थिक दंड आणि प्रतिबंधांची भीती आहे.





