भारताचा बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौरा या महिनाअखेरीस सुरू होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला असून, खेळाडूंनी सराव सुरु केला आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघाने देखील आपल्या तीनही संघांची घोषणा केली आहे. मात्र, या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी उपलब्ध असेल की नाही, याबाबत साशंकता आहे.
डिसेंबरच्या मध्यापासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या कसोटी मालिकेपूर्वी (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी) आराम करणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना कमिन्स म्हणाला, “याविषयी मी अजून अंतिम निर्णय घेतला नाही. सध्या कठीण काळ सुरू आहे. सर्वच खेळाडू दीर्घकाळापासून जैव- सुरक्षित वातावरणात राहत आहेत. आम्ही ज्या वेळेस एकत्र येऊ त्यावेळी, यावर निर्णय घेऊ.”
कमिन्सकडे वनडे व कसोटीचे उपकर्णधारपद
कमिन्सकडे सध्या ऑस्ट्रेलियाच्या वनडे व कसोटी संघाचे उपकर्णधारपद आहे. १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी सिडनी व कॅनबरा येथे वनडे व टी२० मालिका खेळली जाईल. कमिन्सव्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथ व डेविड वॉर्नर हे प्रमुख खेळाडू देखील मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळतील. या खेळाडूंना कसोटी मालिकेपूर्वी अवघ्या एक आठवड्याचा विश्रांती कालावधी मिळेल.
खेळाडूंना आरामाची गरज असेल
थकव्याच्या प्रश्नावर कमिन्स म्हणाला, “आता वातावरण काहीसे उष्ण आहे. पुढे एक वेळ अशी येईल, जेव्हा खेळाडूंना आरामाची नितांत गरज असेल. कारण पुढील काही महिने खूप मालिका खेळायच्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा महत्त्वपूर्ण दौरा देखील पुढे येत आहे.”
ऑस्ट्रेलियाचा हा उपकर्णधार इंग्लंड दौर्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान साऊथॅम्प्टन आणि मँचेस्टरमध्ये जैव- सुरक्षित वातावरणात होता. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी युएईला रवाना झाला. कमिन्स आता सिडनी येथे १४ दिवसांच्या विलगीकरणातून जात आहे. त्यानंतर तो २७ नोव्हेंबरला सिडनी येथे पहिल्या वनडे सामन्यावेळी संघात सामील होईल.
‘तीन महिने जैव- सुरक्षित वातावरणात घालवून बरं वाटत आहे’
जैव- सुरक्षित वातावरणाविषयी बोलताना त्याने म्हटले की, “जैव- सुरक्षित वातावरणात तीन महिने घालवूनही बरं वाटत आहे. युएईमध्ये जैव- सुरक्षित वातावरणात असताना एक फायदा झाला. तो म्हणजे आम्हाला जास्त प्रवास करावा लागला नाही. दरवेळी आयपीएल दरम्यान आम्हाला दररोज वेगवेगळ्या शहरात प्रवास करावा लागतो. मात्र, यावेळी तसे नव्हते.”
फायद्याच्या खेळपट्ट्या मिळाल्या, तर फायदा घेऊ
भारतीय संघाला आपल्या गोलंदाजीने घाबरवणार का? असे विचारल्यावर त्याने उत्तर दिले, “असा काहीही विचार नाही. मात्र तसे करण्यात यशस्वी ठरलो, तर हा बोनस असणार आहे. आमच्या फायद्याच्या खेळपट्ट्या मिळाल्या, तर आम्ही त्याचा फायदा घेऊ.”
मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर ऍडलेड येथे पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जाईल. त्यानंतर, भारतीय कर्णधार विराट कोहली कौटुंबिक कारणामुळे भारतात रवाना होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘असे’ ठरणार कसोटी चॅम्पियनशीपमधील अव्वल दोन संघ; भारतासाठी वाट कठीण
“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
‘डेमियन फ्लेमिंग’… पहाट स्वप्न सत्यात उतरलेले पाहिलेला ऑसींचा एकमेव गोलंदाज
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही