पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वर्षाखेरीस काही वरिष्ठ खेळाडूंना मालामाल केले. पीसीबीने शोएब मलिक, मोहम्मद हाफिज, वहाब रियाज आणि मोहम्मद आमिर यांना मोठी भेट दिली आहे. या सर्व खेळाडूंना पीसीबीच्या वार्षिक करारात, स्थान मिळाले नाही. परंतु पीसीबीने त्यांच्या प्रतिसामना शुल्कात वाढ केली आहे. या सर्वांना ‘अ’ श्रेणीतील क्रिकेटपटूं इतके सामना शुल्क देण्यात येईल.
पीसीबी सीईओने केली होती मागणी
पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी म्हटले होते की, “या वरिष्ठ खेळाडूंना मुख्य करारात स्थान न मिळाल्याने त्यांच्याशी दुर्व्यवहार केला जातोय. या खेळाडूंना ‘अ’ श्रेणीतील क्रिकेटपटू इतके प्रति सामना मानधन देण्यात यावे.”
पूर्वी मिळत होते ‘क’ श्रेणीतील खेळाडूं इतके मानधन
यापूर्वी, वार्षिक करारात समाविष्ट नसल्याने या खेळाडूंना ‘क’ श्रेणीतील खेळाडूं इतके सामना शुल्क देण्यात येत होते. ज्यात वनडे सामन्यांसाठी सुमारे २,०२,००० पाकिस्तानी रुपये, तर टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी त्याहून कमी रक्कम दिली जात होती. आता त्यांना अ श्रेणीतील खेळाडूंच्या बरोबरीने सामना शुल्क मिळेल. आता या खेळाडूंना टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ३,३०,००० रुपये आणि वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ४,६०,००० रुपये मिळतील.
नुकसान भरपाईची मागणी फेटाळली
खेळाडूंच्या प्रतिसामना शुल्कात वाढ केली असली, तरी पीसीबीने या खेळाडूंची दुसरी मागणी फेटाळून लावली. या खेळाडूंनी, राष्ट्रीय संघाशी संबंध असल्याने, इतर देशात व्यावसायिक टी२० लीगमध्ये न खेळल्यामुळे नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज केला होता. त्याविषयी बोलताना पीसीबीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले, “खेळाडूंची दुसरी मागणी मान्य केली गेली नाही. या खेळाडूंना कोणत्याही प्रकारची भरपाई दिली जाणार नाही.”
हाफिजला झाला सर्वाधिक तोटा
अनुभवी खेळाडू मोहम्मद हाफिज याने राष्ट्रीय संघाशी जोडले गेल्याने, लंका प्रीमियर लीग मधूनमाघार घेतली आहे. त्यामुळे त्याला जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. सोबतच, न्यूझीलंड दौऱ्यावेळी उशिराने संघासोबत जोडले जाण्याची त्याची मागणी धुडकावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“होय, गांगुलीचा ‘तो’ झेल शंकास्पद होता”, इंजमामची २१ वर्षांनंतर कबुली