चेन्नई येथे झालेली पहिली कसोटी गमावल्यानंतर दुसर्या सामन्यात भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत इंग्लंडला पराभूत केले. भारताने दुसरा कसोटी सामना ३१७ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ दुसर्या डावात फक्त १६४ धावांत गडगडला. भारताच्या या विजयामुळे चार कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. मात्र, इंग्लंडच्या माजी खेळाडूंना हा पराभव पचलेला नाही. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने भारतीय संघाचे कौतुक करतानाही टोमणे मारण्याची संधी सोडली नाही.
पीटरसनने केले भारतीय संघाचे अभिनंदन
चेन्नई कसोटीच्या चौथ्याच दिवशी भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंडवर मोठा विजय मिळवला. भारताच्या विजयानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने हिंदीमध्ये ट्विट करत लिहिले की, ‘बधाई हो इंडिया, इंग्लंड बी को हराने के लिये (इंग्लंड बी संघाला पराभूत केल्याबद्दल भारताचे अभिनंदन)’.
पीटरसनने या ट्विटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, इंग्लंडने त्यांच्या महत्त्वपूर्ण खेळाडूंना दुसर्या कसोटीत संधी दिली नाही, म्हणूनच भारताने विजय मिळविला. या कसोटी सामन्यादरम्यान केविन पीटरसनने नाणेफेक न जिंकणे, इंग्लंड संघाच्या विरोधात गेले असे म्हटले होते.
https://twitter.com/KP24/status/1361574807167528962
वॉनने गिरवला पीटरसनचा कित्ता
चेन्नईमधील दुसरा कसोटी सामना हरल्यानंतर मायकेल वॉननेही केविन पीटरसनसारखेच काहीसे वक्तव्य केले. तसेच त्याने इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनालाही धारेवर धरले. भारताच्या विजयानंतर वॉनने ट्विट करत लिहिले की, ‘इंग्लंडच्या मजबूत संघाला मैदानात उतरविण्याची वेळ आली आहे. मला वाटले की २०१९ नंतर कसोटी क्रिकेट आणि ऍशेस जिंकणे इंग्लंडची सर्वात मोठी प्राथमिकता असेल. प्रत्येक आठवड्याला कसोटी संघ का बदलत आहे? तर, टी२० संघ पूर्ण सामर्थ्याने मैदानात उतरला जातोय. मोईन अलीला १८ महिन्यांत १ कसोटी खेळविल्यानंतर घरी पाठविण्यात आले.’
https://twitter.com/MichaelVaughan/status/1361594705088286721
भारताचा ऐतिहासिक विजय
भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचे उट्टे काढले. दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला खेळाच्या तिन्ही आघाड्यावर मात देत विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने मालिकेत पुनरागमन केले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अनुषंगाने या विजयाचे भारतीय संघासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुढील दोन पैकी एक सामना जिंकून आणि एक सामना अनिर्णित राखला तरी भारतीय चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात सहभागी होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
चार वर्षानंतर इंग्लिश फलंदाजाने ठोकले सलग तीन षटकार, पहिले नाव आश्चर्यचकित करणारे
क्रिकेटजगताला सुन्न करणारी ‘ती’ घटना, जेव्हा फलंदाजी करताना अचानक झाला होता क्रिकेटरचा मृत्यू
‘कर्णधार’ कोहलीची अझरुद्दीनच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी, आता केवळ एमएस धोनी आहे पुढे






