भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान 4 सामन्याची कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या दोन सामन्यानंतर दोन्ही संघ मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत. मालिकेतील तिसरा व अत्यंत महत्त्वपूर्ण कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड वर होणार आहे. मात्र सामान्य अगोदरच कोरोनाच्या बायोबबल नियमांबद्दल चर्चेला उधाण आले आहे. यासंदर्भात बोलताना भारताचा माजी खेळाडू प्रग्यान ओझाने प्रतिक्रिया दिली आहे की, ऑस्ट्रेलियन संघाला पराभव पचवणे अवघड जात असून त्यामुळे ते अशा चर्चांना उधाण देत आहेत.
मेलबर्न येथील दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू रोहित शर्मा, शुभमगन गिल, नवदीप सैनी, रिषभ पंत व पृथ्वी शॉ मेलबर्न येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यादरम्यान नवलदीप सिंग नामक एका भारतीय चाहत्याने खेळाडूंचे हे बिल त्यांना न सांगता भरले व सोशल मीडियात त्या संदर्भात माहिती दिली. यानंतर मात्र ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने भारतीय खेळाडूंनी बायोबबल नियम मोडल्यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले. या एकूणच परिस्थितीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या व यादरम्यान ओझाने आपली प्रतिक्रिया देत ऑस्ट्रेलियन संघावर नाराजी व्यक्त केली आहे.
एका ऑनलाईन इंटरव्यू दरम्यान ओझा म्हणाला, “संपूर्ण जगाला माहिती आहे की ऑस्ट्रेलियन संघात पराभव पचवण्याची क्षमता नाही. त्यांना हे पचवणे अवघड जात आहे की ,भारतीय संघाने आपल्या 5 प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्यांचा मेलबर्न येथे 8 विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाला वाटले की ते आरामशीर सामना जिंकतील, पण जे काही घडले त्याने ते आश्चर्यचकित आहेत. भारतीय संघ सध्या पूर्णतः मानसिक दृष्ट्या शांत असून ते पुढील सामन्याचे नियोजन करत आहेत.”
दरम्यान मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे होणार असून, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की दोन्ही संघापैकी कोणता संघ उत्कृष्ट खेळ करून मालिकेत आघाडी मिळवतो.
महत्त्वाच्या बातम्या-
सिडनीत भारतीय खेळाडूंवर लागू झालेत निर्बंध; हॉटेलच्या बाहेर जाण्यासही परवानगी नाही
“युवा खेळाडूंनी विलियम्सनचा आदर्श घ्यावा”, न्यूझीलंडच्या कर्णधाराची भारताच्या माजी खेळाडूकडून स्तुती