---Advertisement---

खुशखबर! कोलंबो टू इंग्लंड, विराटसेनेत सहभागी होण्यासाठी ‘या’ दिवशी उड्डाण भरणार सूर्यकुमार आणि शॉ

On: शनिवार, जुलै 31, 2021 9:22 AM
---Advertisement---

शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचा श्रीलंका दौरा संपल्यानंतर सर्वांच्या नजरा आगामी इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेवर आहेत. ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथील पहिल्या सामन्याने या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शुभारंभ होणार आहे. तत्पुर्वी ३ भारतीय क्रिकेटपटू दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडल्याने युवा शिलेदार पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना कसोटी संघात सहभागी करण्यात आले आहे. परंतु कोरोना पॉझिटिव्ह संघ सहकारी कृणाल पंड्याच्या संपर्कात आल्याने त्यांच्यापुढील समस्या वाढल्याचे दिसत होते. मात्र आता आनंदाची बातमी पुढे येत आहे.

सलामीवीर शॉ आणि विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यांना शनिवारी (३१ जुलै) इंग्लंडला रवाना करण्यात येणार असल्याचे समजत आहे. हे दोन्ही क्रिकेटपटू सध्या श्रीलंकेतील कोलंबो शहरातच थांबले आहेत. तिथूनच शनिवारी ते यूनायटेड किंगडमला (युके) जाण्यासाठी उड्डाण भरतील. यूके सरकारच्या प्रवास सल्लागारानुसार श्रीलंका देश रेड लिस्टमध्ये आहे. तरीही या क्रिकेटपटूंना विशेष नियामाद्वारे प्रवासाची परवानगी मिळाली असल्याचे सांगितले जात आहे.

जगभरात कोविड-१९ चा प्रकोप पाहता यूके सरकारने यात्रेसंबंधी काही नियम बनवले आहेत. त्यानुसार रेड लिस्टमध्ये असलेल्या देशांतून केवळ तेच व्यक्ती यूकेला जाऊ शकतात, जे यूके आणि आयरिश नागरिक असतील. तरीही भारतीय क्रिकेटपटू शॉ आणि सूर्यकुमार यूकेला जाऊ शकणार आहेत. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) एका विशेष प्रावधानाचा वापर करुन त्यांना यूकेला पाठवणार आहेत.

या विशेष प्रावधानानुसार यूकेच्या उन्हाळी सत्राच्या सुरुवातीला एलीट क्रिडापटूला रेड लिस्ट देशांतूनही प्रवास करण्याची अनुमती मिळाली होती. युरो चषक आणि विंबलडन चषकासाठी फुटबॉलपटू व टेनिसपटूंसाठी हा नियम बनवण्यात आला होता.

ईसीबीच्या एका अधिकाऱ्याने क्रिकबझला यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “यूके सरकारने या उन्हाळी सत्राच्या सुरुवातीला भारतीय टूरिंग पार्टीला पहिल्या स्थानावर प्रवास करण्यास मदत करण्यासाठी एलीट क्रिडापटूचा नियम बनवण्यात आला होता. तसेच या नियमाअंतर्गत युरो आणि विंबलडन चषकाबरोबर इतर खेळांतील क्रिडापटूंना यूकेला जाण्याची परवानगी मिळाली होती. आता सूर्यकुमार आणि शॉसाठी या नियमाचा उपयोग केला जाणार आहे.”

पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीला मुकणार!
महत्त्वाचे म्हणजे, जरी विशेष प्रावधानामुळे शॉ आणि सूर्यकुमार ३१ जुलै रोजी इंग्लंडला रवाना झाले. तरीही त्यांना तिथे पोहोचल्यानंतर १० दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यानंतरच ते भारतीय कसोटी संघासोबत सहभागी होऊ शकतील. अशात हे दोघेही इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यांना मुकतील. कारण पहिला कसोटी सामना ४-८ ऑगस्ट दरम्यान नॉटिंघम येथे होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना १२-१६ ऑगस्ट दरम्यान होईल.

अशात दुसऱ्या कसोटीपुर्वी त्यांचा विलगीकरण कालावधी समाप्त होईल. पण त्यानंतर त्यांना काही दिवस सराव करावा लागेल. मगच ते इंग्लंडशी दोन हात करण्यास सज्ज होतील. त्यामुळे पृथ्वी आणि सूर्यकुमार तिसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत आपल्या संधीची प्रतिक्षा करावी लागू शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---