कोलंबो। रविवारी(२५ जुलै) भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात ३८ धावांनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, या सामन्यात भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ धावा करण्याच पूर्णपणे अपयशी ठरला. असे असले तरी त्याच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण होताच नावावर झाला मोठा विक्रम
पृथ्वी शॉचा हा कारकिर्दीतील पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता. त्याने या सामन्यातून भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये खेळणारा शॉ भारताचा ८६ वा खेळाडू ठरला. २२ वर्षीय शॉने यापूर्वी भारताकडून २०१८ साली कसोटीत आणि २०२० साली वनडेत पदार्पण केले होते.
शॉने रविवारी भारताकडून सलामीला फलंदाजीला देखील उतरला होता. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारताकडून डावाची सुरुवात करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. तो रविवारी जेव्हा मैदानात उतरला, तेव्हा त्याचे वय २१ वर्षे आणि २५८ दिवस होते. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. त्याने जेव्हा पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात भारतासाठी डावाची सुरुवात केली होती, तेव्हा तो २२ वर्षे आणि ३७ दिवसांचा होता.
याशिवाय पृथ्वी शॉ हा असा पहिलाच भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने वयाच्या २४ व्या वर्षापूर्वीच कसोटी, वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजीला येत डावाची सुरुवात केली आहे.
भारताकडून टी२०मध्ये सर्वात कमी वयात सलामीला फलंदाजी करणारे फलंदाज
२१ वर्षे २५८ दिवस – पृथ्वी शॉ
२२ वर्षे ३७ दिवस – रोहित शर्मा
२२ वर्षे ६५ दिवस – विराट कोहली
२२ वर्षे २३९ दिवस – इशान किशन
२३ वर्षे ८६ दिवस – अजिंक्य रहाणे
शुन्यावर बाद झाला शॉ
शॉने जरी विक्रम केले असले तरी त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील पदार्पण निराशाजनक ठरलं. तो डावाच्या पहिल्याच चेंडूवर शून्य धावेवर दुशमंथा चमिरा विरुद्ध खेळताना यष्टीरक्षक मिनोद भानुकाकडे झेल देऊन बाद झाला. आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणात पहिल्याच चेंडूवर बाद होणारा तो केएल राहुल नंतरचा दुसराच भारतीय क्रिकेटपटू ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक करताच सूर्यकुमार यादवच्या नावावर झाला ‘मोठा’ विक्रम; गंभीर, रैनाही पडले मागे
हार्दिक पंड्या गात होता चक्क श्रीलंकन राष्ट्रगीत? व्हिडिओ झाला व्हायरल