प्रो कबड्डी लीग २०२१-२०२२ च्या सतराव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटण व जयपुर पिंक पँथर्स संघ समोरासमोर आले. काहीशी संथ सुरुवात झालेल्या या सामन्याने नंतर मात्र प्रेक्षकांची मने जिंकली. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात जयपुरने ३१-२६ असा विजय मिळवला.
सामन्याच्या सुरुवातीला दीपक निवास हुड्डा याच्या नेतृत्वातील जयपुर संघाने तुफानी सुरुवात केली. पहिल्या १० मिनिटांमध्ये त्यांनी पुणे संघाला ऑल आउट करत १४-६ अशी मोठी आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर पुणे संघाने सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. मोहित गोयत, पंकज मोहिते व अस्लम इनामदार या युवा रेडरनी आक्रमक खेळ करत जयपुर संघाला ऑल आउट करण्यात यश मिळवले. पहिल्या हाफच्या अखेरीस जयपुर संघाकडे नाममात्र एका गुणाची आघाडी होती.
दुसऱ्या सत्राला १८-१९ अशी सुरुवात झाल्यानंतर दोन्ही संघांनी ताकद आजमावून पाहिली. पुणे संघाचा नियमित कर्णधार नितीन तोमर यांनी या सामन्यातून पुनरागमन केले. मात्र, तो इच्छित छाप पाडू शकला नाही. सामना संपण्यास चार मिनिटे शिल्लक असताना जयपुरने पुणे संघाला ऑल आउट करत सामना जवळपास खिशात घातला. अखेरची मिनिटे संयमाने खेळून काढत जयपुरने सामना आपल्या नावे केला.